सूर्य पूर्णपणे मावळला नसतानाही पश्चिम क्षितिजावर अतिशय तेजस्वी अशा ‘पॅन स्टार’ धूमकेतूचे विलोभनीय दर्शन बुधवारी सायंकाळी नाशिकच्या खगोलप्रेमींना झाले. सायंकाळी ६.४० ते ७.०० या ४० मिनिटांच्या काळात पश्चिम क्षितिजावर १० अंश उंचीवर हा धूमकेतू पाहावयास मिळाल्याचे खगोलतज्ज्ञांकडून सांगण्यात आले. सायंकाळी उशिराने तो पाहावयास मिळू शकला असता; परंतु नेमक्या त्याच वेळी अवकाशात ढग दाटल्याने तो दिसेनासा झाला.
जून २०११ मध्ये शोध लागलेला धूमकेतू ‘पॅन स्टार’ हा सध्या सूर्याच्या जवळून जात असून तो १३ ते १५ मार्च या कालावधीत सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर पाहावयास मिळण्याची शक्यता आधी वर्तविण्यात आली होती. १३ मार्च रोजी चंद्रकोर धूमकेतूच्या उजव्या बाजूस किंवा किंचित वर असल्याने तो या दिवशी अतिशय सुस्पष्टपणे दिसेल, असेही खगोलतज्ज्ञांचे म्हणणे होते. धूमकेतूच्या निरीक्षणासाठी खगोलप्रेमींनी आधीच मोर्चेबांधणी केली. सायंकाळी दुर्बिणीद्वारे अवकाशात सुरू झालेला धूमकेतूचा शोध अवघ्या काही मिनिटांत संपुष्टात आला. सहा वाजून ४० मिनिटांनी म्हणजे सूर्य पूर्णपणे मावळला नसताना तो पश्चिम क्षितिजावर दिसू लागला. दक्षिणेकडून तो उत्तरेकडे सरकत होता. अतिशय तेजस्वी असणारा हा धूमकेतू नंतर बराच वेळ साध्या डोळ्यांनी दिसत होता, अशी माहिती खगोलतज्ज्ञ प्रा. गिरीश पिंपळे यांनी दिली. धूमकेतूची शेपटी ही सूर्याच्या विरुद्ध दिशेला असते. ‘पॅन स्टॉर’च्या शेपटीचा भागही अतिशय स्पष्टपणे दिसत होता. १४ मार्च रोजीही हा धूमकेतू पश्चिम क्षितिजावर दिसण्याची शक्यता आहे. ‘पॅन स्टार’चा शोध हवाई बेटातील हेलिकना शिखरावरील रोबोटिक दुर्बिणीने लावला होता. शोध लागल्यानंतर निरीक्षणातून तो प्रखर होईल, असेही दिसून आले होते. त्याची प्रचीती बुधवारी नाशिककरांना अनुभवयास मिळाली.

Story img Loader