ATM in Panchavati Express : Gpay, PhonePe किंवा अशाच इतर ऑनलईन पेमेंट सुविधांचा वापर हल्ली मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सध्या बाजारात होणारे व्यवहार प्रामुख्याने अशा पेमेंट सुविधांवर अवलंबून आहेत. ही ग्राहकांसाठी महत्त्वाची सुविधा असली, तरी यामुळे अनेकांची अनेकदा पंचाईत होण्याचे प्रसंगही उद्भवतात. खिशात रोख रक्कम ठेवण्याचीच सवय मोडू लागल्यामुळे ऐनवेळी रोख रक्कम लागल्यास अडचण होते. असाच काहीसा प्रकार रेल्वेनं प्रवास करताना सहज घडू शकतो. पण त्यावरच भारतीय रेल्वेनं अत्यंत महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे!
रेल्वे प्रवासादरम्यान काहीही खरेदी करायचे असल्यास त्यासाठी रोख रक्कमच बहुतेक वेळा द्यावी लागते. अशावेळी खिशात रोख रक्कम नसेल, तर प्रवाशांची मोठी अडचण होते. पण आता प्रवाशांची ही अडचण होणार नाही. कारण भारतीय रेल्वेनं थेट धावत्या रेल्वेमध्येच एटीएमधून पैसे काढण्याची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
भारतातला पहिला प्रयोग!
धावत्या ट्रेनमध्येच एटीएमचं मशीन बसवून त्या माध्यमातून प्रवाशांना खात्यातून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा देशभरातला पहिला प्रयोग आहे. अशा प्रकारचं पहिलं ATM नाशिकमधील मनमाड ते मुंबई प्रवासी वाहतूक करणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये बसवण्यात आलं आहे. दररोज या ट्रेननं हजारो मुंबईकर व नाशिककर ये-जा करत असतात. आता या प्रवासादरम्यान प्रवाशांना थेट एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध असेल.
कधी झाली चाचणी?
मंगळवारी सकाळी ही चाचणी घेण्यात आली. पंचवटी एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यामध्ये हे एटीएम बसवण्यात आलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, धावत्या ट्रेनमध्ये एटीएममधून पैसे काढण्याची ही चाचणी यशस्वी झाली आहे. इगतपुरी ते कसारा या पट्ट्यामध्ये नेटवर्कची समस्या आल्यामुळे तेवढा भाग वगळता इतर वेळी एटीएममधून विनासायास पैसे काढता येत असल्याचं चाचणीतून स्पष्ट झालं आहे.
रेल्वे व बँकेचा संयुक्त उपक्रम
नॉन फेअर रेव्हेन्यू आयडिया स्कीम अर्थात INFRIS या उपक्रमांतर्गत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भुसावळ रेल्वे विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनी संयुक्तपणे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पंचवटी एक्स्प्रेसच्या सर्व डब्यांमधील प्रवाशांना या एटीएमचा वापर करून पैसे काढता येणार आहेत. त्याशिवाय, या रेल्वेचे डबे पुढे मुंबई-हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेसलादेखील जोडले जातात. त्यामुळे त्या ट्रेनमध्येही ही सुविधा वापरण्यासाठी उपलब्ध असेल.
आता या एटीएम सुविधेचा वापर कसा केला जातो यासंदर्भात कालांतराने आढावा घेऊन त्यानंतर ही सुविधा इतर रेल्वेगाड्यांमध्येही उपलब्ध करून देण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. या एटीएमच्या सुरक्षेसाठी २४ तास सीसीटीव्हीची निगराणी व एटीएम मशीनला शटर बसवण्यात आलेलं आहे.