पाटण तालुक्यातील काळगावचे ग्रामपंचायत सदस्य गुणवंत हरी कुष्टे (वय ४३) यांचा निर्घृण खून झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ते भाडेतत्त्वार राहात असलेल्या मलकापूर येथील खोलीमध्ये घडली. पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले. तपासही गतीने सुरू आहे. परंतु, सायंकाळपर्यंत या खुनाचे कारण समजू शकले नव्हते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुणवंत कुष्टे हे सराफ व्यावसायिकही आहेत. ते कराडनजीकच्या मलकापूर येथील शारदा मंगल कार्यालयाशेजारील नानासाहेब सावंत यांच्या मालकीच्या चाळीत वर्षभरापासून भाडोत्री म्हणून राहात होते. त्यांच्या पत्नीच्या जवळच्या नातेवाईकाचे निधन झाल्याने त्या दोन दिवसांपूर्वीच मुंबईला गेल्या आहेत. तर, मुलगा विघ्नेश हा इस्लामपूर येथे आजोबांकडे गेला आहे. आज सकाळी सावंत यांची वहिनी अंगण झाडत असताना, पाच, ते सहा युवक तेथे आले. बाहेरच उभ्या असलेल्या कुष्टे यांना ते घरात घेऊन गेले. आणि त्यांनी दरवाजाची कडी लावून घेतली. १५ ते २० मिनिटांनी ते युवक घराबाहेर पडले. काही अंतरावर उभ्या असलेल्या लाल रंगाच्या मालवाहू रिक्षात बसून, त्यांनी कोल्हापूरच्या बाजूकडे पलायन केले. हा प्रकार नानासाहेब सावंत यांच्या भावजयीने त्यांना सांगितला. सावंत यांनी तत्काळ कुष्टेंच्या खोलीकडे धाव घेऊन खिडकीतून पाहिले असता, कुष्टे बेडवर मृतावस्थेत पडले होते. त्यांचे दोन्ही हात बांधलेले तर, तोंडाला चिकटपट्टय़ा गुंडाळल्या होत्या. सावंत यांनी याबाबतची माहिती सत्वर शहर पोलिसांना दिली. यावर पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडून पाहिल्यावर कुष्टे यांचा निर्घृण खून झाल्याचे उघड झाले.
ग्रामपंचायत सदस्याचा मलकापुरात निर्घृण खून
पाटण तालुक्यातील काळगावचे ग्रामपंचायत सदस्य गुणवंत हरी कुष्टे (वय ४३) यांचा निर्घृण खून झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ते भाडेतत्त्वार राहात असलेल्या मलकापूर येथील खोलीमध्ये घडली.

First published on: 11-04-2014 at 03:48 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atrocious murder of panchayat member