जंगली हत्तींनी आतापर्यंत कोटय़वधी रुपयांचे नुकसान केले असतानाच बिबटय़ा, रानगवा, रानडुक्कर यांनीही सुमारे दहा लाखांचे नुकसान केले आहे. गेल्या चार वर्षांत १४ जणांना जखमी, तर एकाला ठार मारले आहे.
कुडाळ येथील नंदकुमार बोर्डेकर हा रानडुकराच्या हल्ल्यात २० जानेवारी २०११ रोजी मयत झाला. त्याला शासनाने दोन लाख रुपयांची भरपाईसुद्धा दिली आहे.
किंजवडे येथील विश्वास परब व जयंती परब यांना २३ नोव्हेंबर २००८ रोजी बिबटय़ाने जखमी केले. आंदुर्ले येथील मनीषा मंगेश भाईप हिला रानडुकराने ८ नोव्हेंबर २००९ रोजी जखमी केले.
कुंभवडे येथील गोविंद कृष्णा गावडे याला २१ फेब्रुवारी २०१० साली डेगवे येथील मंगेश दत्ताराम देसाईला ५ सप्टेंबर २०१० रोजी जखमी केले. परुळे येथील भिकाजी पुंडलिक दाभोलकर यावर २८ ऑगस्ट २०१० रोजी बिबटय़ाने हल्ला केला.
हुकेरी येथील विजय देवू जंगले याच्यावर रानगव्याने ६ ऑक्टोबर २०१०, रूमडगांव येथील सरिता रामचंद्र भांबाळे यांच्यावर २३ मार्च २०११ रोजी रानडुकराने, कुंभवडे येथील रामचंद्र धोंडू गावडे याच्यावर २८ मार्च २०११ रोजी रानगव्याने हल्ला केला.
आंबेगाव येथील जयवंती मेस्त्री हिच्यावर ३१ डिसेंबर ११ रोजी रानगवा, इन्सुली येथील पार्वती गोविंद तावडे हिच्यावर २५ फेब्रुवारी २०१२ रोजी रानडुक्कर, बिलवडे येथील चंद्रकांत परब याच्यावर १८ एप्रिल १२ रोजी रानगवा, चौकुळ येथील धोंडिबा कृष्णा नाईकवर २३ सप्टेंबर १२ रोजी अस्वलाने, तर बिलवडे येथील मोहन विष्णू गावडेवर ३० ऑगस्ट १२ रोजी रानगव्याने हल्ला केला. या हल्ल्यामुळे १५ जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी काहींना उपचारार्थ, काहींना भरपाई म्हणून वनखात्याने नुकसानी दिली. रानगव्याकडून भातशेती व बागायतीचे नुकसान झाले. त्यात सन २००६ मध्ये ५१ प्रकरणांत २१ हजार, सन २००७ मध्ये ६२ प्रकरणांद्वारे ५१ हजार, सन २००८ मध्ये ३३ प्रकरणांतून ३४ हजार, सन २००९ मध्ये २६० रुपये, तर सन २०१० मध्ये १७ प्रकरणांत रु. ७ हजार २१० एवढे नुकसान झाले आहे.
कृषी अहवालानुसार ४६५ प्रकरणांत सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. प्रत्यक्षात ते त्याहीपेक्षा अधिक आहे. वन हत्ती व वन्यप्राणी शेती-बागायतीचे प्रचंड नुकसान करीत आहेत. शिवाय माणसांनाही लक्ष्य करत असल्याने वन खात्याच्या कारभाराविरोधात प्रचंड नाराजी आहे.
जंगली प्राण्यांना जंगल सुरक्षित वाटत नसल्याने ते लोकवस्तीत घुसत आहेत. त्यामुळे आपसूकच मानव व वन्यप्राणी यांच्यात संघर्ष होऊ लागला असल्याचे मानले जाते. डोंगरात सध्या बेसुमार वृक्षतोड होत असल्याने वन्यप्राणी सैरावैरा लोकवस्तीकडे धावत आहेत. तसेच काही शिकारीही वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी पाठलाग करत आहेत.

Story img Loader