Attack on Jitendra Awhad Vehical : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनांवर स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. आज ठाणे येथील घरी परतत असताना पोलीसांच्या समोरच तीन कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या विशाळगडावर झालेल्या दंगलीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती. संभाजीरांजेंच्या शरीरात छत्रपती शाहू महाराजांचे रक्त वाहत आहे का? हे तपासावे लागेल, असे विधान आव्हाड यांनी केले होते. या विधानाचा राग डोक्यात धरून स्वराज्य संघटनेकडून आज आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला.
हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
या हल्ल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले, “तीन जणांनी आज माझ्या गाडीवर हल्ला केला. माझ्याकडे चार पोलीस होते, पण मी त्या तरुणांवर कोणताही हल्ला करण्यास सांगितले नाही. मी आशा भ्याड हल्ल्यांना घाबरणार नाही. मी विशाळगडाबाबत बोललो कारण छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा जो वारसा दिला आहे, तो संभाजीराजेंनी पुढे न्यायला पाहीजे होता. पण त्यांनी केवळ बोलघेवडेपणा केला. माझ्या गाडीवर हल्ला करून मी शांत बसेन असे तुम्हाला वाटत असेल पण तसे होणार नाही मी आणखी त्वेषाने तुमच्याविरोधात बोलणार आहे. आतापर्यंत तुम्हाला आदरार्थी बोलत होतो, पण आता मी बोलण्यासाठी मोकळा आहे.”
हे वाचा >> विशाळगड अतिक्रमण प्रश्नी संभाजीराजेंचा राजकीय हेतू कोणता? कोल्हापुरात सकल हिंदू समाजाची विचारणा
संभाजीराजेंवर काय टीका केली होती?
विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्याकडून विशाळगड येथे आंदोलनही करण्यात आले. मात्र या आंदोलनाच्या निमित्ताने विशाळगडावर काही समाजकंटकांनी तोडफोड केली. यानंतर संभाजीराजेंवर टीका करत असताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “संभाजीराजेंना आता छत्रपती म्हणणे सोडून द्या. कारण त्यांना वंशपंरपरागत जो अधिकार मिळाला होता, तो पुढे घेऊन जाण्याची त्यांची जबाबदारी होती. शाहू महाराज आणि संभाजीराजेंच्या रक्तात काय आहे? हे तपासण्याची गरज आहे.”
हे ही वाचा >> विशाळगड हिंसाचार : मुसळधार पावसामुळे कायदा-सुव्यवस्था हातात घेणाऱ्यांवरील कारवाईत अडचणी, राज्य सरकारचा दावा
शाहू महाराजांच्या घराण्यातला माणूस असे विधान करतो की, ज्यामुळे दंगल उसळते, तो शाहू महाराजांच्या घरातील असूच शकत नाही. त्यामुळे त्यांना छत्रपती कुणी म्हणावे, याचा विचार झाला पाहीजे. ज्यांच्याकडे कर्तुत्व आहे, त्यांना छत्रपती म्हणावे. आताचे शाहू महाराज यांना मी नक्कीच छत्रपती म्हणेण. कारण त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून लोकांची माफी मागितली. जे राजेघराण्यातील लोकांनी करायला पाहीजे, ते शाहू महाराजांनी केले होते, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.