छत्रपती संभाजीनगर : धाराशिवच्या भूम तालुक्यातील बावी येथे मुलीला केलेल्या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या कुटुंबावर हल्ला झाल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली असून, यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले. तर घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी २५ फेब्रुवारीला गाव बंद ठेवून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.याप्रकरणी बावी येथील भागवत राजेंद्र उभे यांनी भूम पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून बाबा विजय काळे, विजय राजाराम काळे, राजाराम काळे, आरती विजय काळे, मोनिका काळे (सर्व रा. बावी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील चार आरोपींना अटक केली असून, एक जण पसार असल्याची माहिती उपनिरीक्षक वर्षा साबळे यांनी दिली. उभे कुटुंबाच्यासमोरून जाताना बाबा काळे हा दुचाकीवरून जात असताना आवाज करत जात येत असे. तसेच अश्लील हावभावही करत होता. शिवाय अनेकदा छेडछाडीचे प्रकारही केले होते. त्याविषयी सांगून गावच्या सरपंचांनीही वाद मिटवला होता. त्यानंतरही आरोपी बाबा काळे याच्याकडून छेडछाड सुरूच होती. त्याचाच जाब भागवत उभे यांनी विचारला असता आरोपींनी उभे कुटुंबीय अंगणात बसलेले असताना हातातील लोखंडी गजाने हल्ला केला. बाबा काळे व विजय काळे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. घरातील मोठा भाऊ अशोक यासही गजाने मारहाण केली. यात तक्रारदाराची आई इंदुबाई व पत्नी चंदा उभे यांनाही विजय काळे व मोनिका बाबा काळे लाथा बुक्क्याने मारहाण केली. घटनेतील जखमी अशोक राजेंद्र उभे व त्यांची आई इंदुबाई उभे यांना उपचारासाठी धाराशिव येथे हलवण्यात आले आहे.