येथील सेवाभावी डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या रुग्णालयावर सोमवारी रात्री ११ च्या सुमारास भागवत लांडगे व त्याच्या अज्ञात साथीदारांनी हल्ला करून रुग्णालयाची व वाहनांची मोडतोड करून दहशत निर्माण केली. हल्लेखोरांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी राहाता तालुका डॉक्टर्स असोसिएशनने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की भागवत लांडगे व त्याचे अज्ञात साथीदार डॉ.पानगव्हाणे यांच्या रुग्णालयात रात्री आले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना डॉक्टरांना रुग्ण तपासण्यासाठी खाली बोलवा असे सांगितले. कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांची तब्बेत ठीक नसल्याने ते येऊ शकणार नसल्याचे सांगताच लांडगे व त्याच्या साथीदारांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व दमदाटी करून रुग्णालयाची व डॉक्टरांच्या वाहनांची तोडफोड केली. याबाबतची तक्रार डॉ. पानगव्हाणे व नगरसेवक संजय सदाफळ यांनी मध्यरात्रीच पोलिसांकडे नोंदविली. सकाळी उशिरापर्यंत पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्याने राहाता तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी राहाता पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दीपक म्हस्के, सचिव डॉ. नचिकेत वर्पे यांनी पोलीस निरीक्षक आर. एस. सोमवंशी यांना निवेदन दिले.
डॉ. वर्पे यांनी हल्लेखोरांना त्वरित अटक करून त्यांच्यावर डॉक्टर्स प्रोबेशन अॅक्ट लागू करावा अशी मागणी केली. शहर व तालुक्यातील डॉक्टर्स व त्यांच्या रुग्णालयावर वारंवार अशाप्रकारचे हल्ले समाजकंटकांकडून होत असतात. याबाबत असोसिएशनने वारंवार पोलिसांना निवेदने देऊन घटनेची माहिती दिलेली आहे. डॉ. पानगव्हाणे यांचे रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यातील आरोपींना डॉक्टर्स संरक्षण कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी केली. या निवेदनावर डॉ. पी. जी. गुंजाळ, डॉ. के. वाय. गाडेकर, डॉ. संतोष मैड, डॉ. संतोष दिघोळकर, डॉ. रविराज घोगरे, डॉ. विजय म्हस्के, डॉ. अंजली पानगव्हाणे, डॉ. विनयानंद पाटील, डॉ. गोरे, डॉ. अमोल बेंद्रे, डॉ. विजय निद्रे, डॉ. लव्हाटे, डॉ. कुंदन वाणी, डॉ. लावरे, डॉ. संजय गाडेकर, डॉ. गायके, डॉ. काळोखे, डॉ. भालके, डॉ. स्वाधीन गाडेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पानगव्हाणे रुग्णालयाची हल्लेखोरांकडून तोडफोड
येथील सेवाभावी डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या रुग्णालयावर सोमवारी रात्री ११ च्या सुमारास भागवत लांडगे व त्याच्या अज्ञात साथीदारांनी हल्ला करून रुग्णालयाची व वाहनांची मोडतोड करून दहशत निर्माण केली.
First published on: 12-03-2014 at 02:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on panagavhane hospital