खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर झालेला हल्ला ही शिवसेना उमेदवाराची दहशतवादाची पहिली सलामी आहे. नगर जिल्ह्यतील शिवसैनिक हल्लेखोर नाहीत. हा जिल्हा चळवळीचा आहे. परंतु शिवसैनिकांच्या खांद्यावर कुणी बंदूक ठेवून हे काम करीत असेल, तर त्यांना या निवडणुकीत जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी दिला.
खा. वाकचौरे यांच्यावर सोमवारी संगमनेर येथे हल्ला झाला. या घटनेचा विखे यांनी निषेध करून आज वाकचौरे यांची त्यांच्या शिर्डी येथील निवासस्थानी भेट घेतली. या वेळी शिर्डीचे नगराध्यक्ष कैलास कोते, उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर, नगरसेवक राजेंद्र कोते, विलास कोते, रावसाहेब तनपुरे, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, विखे म्हणाले, हल्ले, दहशत निर्माण करणे हे निवडणुकीतील भ्याडपणाचे लक्षण आहे. निवडणुकीच्या काळात पक्षांतरे सतत होत असतात. ती न थांबणारी प्रक्रिया आहे. ज्याला कोठे योग्य वाटते ते तिकडे जातात. परंतु वाकचौरे हे मूळच्या काँग्रेसच्या विचारसरणीचे असल्याने ते पुन्हा काँग्रेसच्या संस्कृतीत आले. त्यांच्यावर हल्ला कोणी केला हे जगजाहीर आहे. शिवसैनिक सातत्याने अन्यायाच्या विरोधात झगडत असतात. जिल्ह्यात दहशतवाद नाही, परंतु काही मंडळी दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्याने यातून जिल्ह्यातील शिवसेनेची बदनामी होत आहे. या दहशतवादाचा जनतेने मुकाबला करावा.
दहशतवादाला आम्ही उत्तर देऊ शकतो. आमची हात बांधलेले नाहीत. परंतु काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचा व महात्मा गांधीजींच्या विचारसरणीचा आहे. काँग्रेसला ही निवडणूक जिंकायची असल्याने आम्ही हात व तोंड वापरणार नाही. काँग्रेसचा हात मदतीसाठी आहे. हाणामारीसाठी नाही, असे स्पष्ट करून विखे म्हणाले, वाकचौरेंवर हल्ला होणार होता याची कल्पना असतानाही, प्रशासन गाफील राहिले. काँग्रेसचे राजकारण सर्वसमावेशक आहे. वैमनस्याचे नाही. माझ्यावर टीका करून काहींचे मानसिक समाधान होत असेल, तर माझी भूमिका श्रद्धा व सबुरीची आहे. वाकचौरेंची पाच वर्षे सर्वसमावेशक काम करून त्यांनी कुठलाही पक्ष अथवा व्यक्तिगत टीका केली नाही. ही विचार व विकासाची लढाई आहे. विचार हा विचारानेच संपविला पाहिजे. मंत्री राधाकृष्ण विखे व मी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलो. त्या वेळी आमच्यावर शिवसैनिकांनी हल्ले केले नाहीत. वाकचौरेंवर झालेला हल्ला म्हणजे जिल्ह्याला व शिवसेनेला काळिमा आहे. अशीच शिवसेनेच्या उमेदवाराची सलामी असेल, तर त्यांना मतदार प्रायश्चित्त घडविल्याशिवाय राहाणार नाहीत. व्यक्तिगत दहशतवादाला जिल्ह्यातील शिवसैनिकांनी कधीही पाठिंबा दिलेला नाही. दहशतवाद निर्माण करून उमेदवारीला घाबरून निवडणूक लढविणार का? असाही सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला.