निलंग्याच्या नगराध्यक्ष विद्याताई धानोरकर यांच्या घरावर सुमारे ३०-४०जणांनी हल्ला करून कुटुंबातील व्यक्तींना मारहाण केली. याबरोबरच कुटुंबीयांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. घरातील रोख रकमेसह सोन्याची साखळी असा ७२ हजारांचा ऐवज घेऊन हल्लेखोर पसार झाले. या प्रकरणी नगराध्यक्षांच्या फिर्यादीवरून हल्लेखोरांविरुद्ध लूट व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
रविवारी सायंकाळी दत्तनगर भागात झालेल्या किरकोळ भांडणाची कुरापत काढून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ३०-४०जणांनी नगराध्यक्ष धानोरकर यांच्या घरावर हल्ला केला. हल्लेखोरांनी घरात घुसून नगराध्यक्षांचे पती, मुलगा व घरातील इतर व्यक्तींना शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या वेळी घरातील २२ हजार रुपये रोख, नगराध्यक्षांचे पती भास्कर धानोरकर व मुलगा शैलेश यांच्या गळय़ातील सोन्याची साखळी घेऊन हल्लेखोर पळून गेले.
नगराध्यक्षांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलंगा पोलीस ठाण्यात आरोपी इरफान शेख, शाहरूख पाटेवाले, चिंग्या सय्यद, मुजीद कादरी, अन्नू कादरी याच्यासह इतर ३०-४०जणांविरुद्ध संगनमत करून मारहाण, तसेच घरातील ऐवज लुटून नेल्याचा गुन्हा दाखल झाला. या गुन्हय़ातील ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपीसह इतर आरोपी मात्र फरारी आहेत.
वेळ अमावास्येच्या सायंकाळीच नगराध्यक्षांच्या घरावर झालेल्या हल्ल्याने व मारहाणीने शहरातील सामान्य नागरिकांत दहशत निर्माण झाली. पोलीस खात्याने वारंवार किरकोळ कारणावरून गुंडगिरी करणाऱ्या प्रवृत्ती व व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी शेलार यांनी, कायदा व सुव्यवस्था राखताना कोणाचाही मुलाहिजा न ठेवता आरोपींवर कठोर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. पोलीस निरीक्षक खेडकर यांनी, गुन्हय़ातील फरारी आरोपींना लवकरच अटक करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

Story img Loader