महापौरांच्या राजीनाम्यावरून करवीरनगरीत राजकीय शिमगा सुरू आहे. जो-तो दुसऱ्याच्या नावाने शंखध्वनी करीत आहे. आरोप-प्रत्यारोपाची राळ उठली आहे. राजकीय बोंबामध्ये नेते, नगरसेवक, कार्यकत्रे व्यस्त झाले असल्याने नगरीच्या विकासाच्या नावाने मात्र केवळ बोंब उरली आहे.
गेल्या महिन्याभरापासून महापौर पदाच्या राजीनाम्यावरून राजकीय वादळ घोंगावत आहे. महापौर तृप्ती माळवी या १६ हजाराची लाच स्वीकारत असताना रंगेहात पकडल्या गेल्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ व नगरसेवकांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. पण पक्षाची प्रतिमा व लोकक्षोभ लक्षात घेऊन माळवी यांच्यापासून चार हात दूर राहणे पसंद केले. तितक्यावर न थांबता लाचखोर माळवी यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणीही सुरू केली. त्यासाठी त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दबाव टाकणे सुरू झाले. महापौरांच्या सार्वजनिक व महापालिकेतील सर्वसाधारण सभा, अन्य कार्यक्रमांवरही बहिष्काराचे सत्र सुरू ठेवले. त्यातूनही महापौर राजीनामा न देण्यावर ठाम राहिल्याने आता त्यांच्या भ्रष्ट प्रतिमेवरून महापालिकेच्या आवारातच शिव्यांची लाखोली नगरसेवकांकडून वाहिली जात आहे. शिवसेनेने तर महापौरांच्या नावाने शिमगा करीत शंखध्वनीही केला. महापौरांचे वाहन अडवून त्यांच्या गाडीवर लाठय़ांचा प्रहार नगरसेवक-नगरसेविकांनी केला. महापौरांच्या निवासस्थानावर मध्यरात्री दगडफेकही करण्यात आली.
तृप्ती माळवी यांचे लाचखोरीचे प्रकरण उघड असून त्यामध्ये त्यांना अटकही झाली. त्या भ्रष्टाचारी ठरल्या आहेत हे निश्चित. पण या एका कारणामुळे एका महिलेला एकटे गाठून महापालिकेच्या चौकात अडवून वाहनांवर काठय़ा मारणे आणि घरावर दगडफेक करणे हे नतिकतेच्या कोणत्या चौकटीत बसणारे आहे. छत्रपती ताराराणीचा वारसा सांगितला जाणाऱ्र्या शहरात विधवा महिलेस एकाकी गाठून उघडपणे अन् गनिमी काव्याने लक्ष्य केले जात आहे. एक-दोन दिवसात जागतिक महिला दिनाचे कार्यक्रम राजकीय पक्षाकडून वाजत-गाजत साजरे केले जात असताना महापौरपदी असलेल्या महिलेला मात्र सळो की पळो करून सोडण्याचा नगरसेवकांचा पवित्रा वेगळाच अर्थ सांगू पाहत आहे.
महापालिकेतील नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी यांचे अर्थपूर्ण व्यवहार कधीच लपून राहिले नाही. खास कोल्हापुरी भाषेतील ढपला पाडणे, आंबा पाडणे याच्या अर्थपूर्ण व्यवहाराच्या रसाळ कथा महापालिकेत पदोपदी ऐकू येत आहे. स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील नोकरभरती प्रकरणावरून दीर्घ काळ अटक झाली होती. विरोधी पक्षनेते मुरलीधर जाधव यांच्यावर क्रिकेट बेटींग प्रकरणात पोलीस कारवाई झाली. मात्र या दोन्ही कारवाईचे समर्थन अन्य नगरसेवक करताना दिसतात. महापौर या महापालिकेच्या आवारात लाच घेताना पकडल्या गेल्या आहेत. तर देशमुख-जाधव यांचे व्यवहार महापालिकेच्या व्यवहाराच्या चौकटीपलीकडचे आहेत, असे समर्थन केले जात आहे. हे म्हणणे म्हणजे आपल्या गावात चोरी करायचे नाही पण अन्य गावात दरोडा टाकला तर चालेल असे म्हणण्यासारखे आणि तितकेच हास्यास्पदही आहे.
महापौर माळवी यांना महाडिक गटाची छुपी मदत असल्याचे लपून राहिले नाही. अन्य नगरसेवक माळवी यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालत असताना महाडिक समर्थक मात्र महापौरांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात याचा अर्थ साधा-सोपा आहे. यावरून माळवींना मदत करणाऱ्या नेतृत्वाविरोधात महापौर पदाचे वेध लागलेल्या नगरसेवकांकडून शिमगा केला जात आहे. तर महाडिक समर्थक नगरसेवक प्रतिस्पर्धी गटाच्या नावाने शिमगा करीत आहेत. एकूणच महापालिकेत महापौर पदावरून राजकीय होळी पेटली असून जो-तो आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेण्याचाच प्रयत्न करीत आहे. हा सारा प्रकार पाहून विकासकामे ठप्प झाल्याने सामान्य नगरसेवक मात्र राजकीय होळी खेळणाऱ्या नगरसेवकांच्या नावाने बोंब मारताना दिसत आहे.
माळवी यांची मोटार, घरावर दगडफेक प्रकरणी तक्रार
महापौर तृप्ती माळवी यांच्या घरावर बुधवारी मध्यरात्री झालेली दगडफेक आणि त्यांच्या वाहनावर लाठय़ांचा प्रहार करून भीती घालण्याचा नगरसेवकांचा प्रयत्न या दोन्ही घटनांबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल होऊनही तपासात फारशी प्रगती झाली नसल्याचे शुक्रवारी दिसून आले. पोलीस तपासात माळवी समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. तर महापौरांच्या घरावरील दगडफेकीचा प्रकार नेमका कोणी केला हे शोधून काढण्याची मागणी प्रतिस्पर्धी गटाकडून होत आहे.
तृप्ती माळवी यांनी महापौर पदाचा राजीनामा देण्यासाठी दबावाचे राजकारण केले जात आहे. महापालिकेत आयोजित केलेल्या जनता दरबार कार्यक्रमानंतर घरी परतणाऱ्या माळवी यांचे वाहन अडवून नगरसेवक-नगरसेविकांनी झेंडय़ांच्या काठय़ा आपटल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारस राजारामपुरीतील गजबजलेल्या वस्तीत महापौर माळवी यांच्या घरावर अज्ञात जमावाने दगडफेक केली. त्यामध्ये फ्लॅटच्या मागील बाजूस व बेसमेंटमधील खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या. हा प्रकार घडल्यानंतर महापौरांनी अज्ञात २० ते २५ जणांविरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल केला.
तथापि या दोन घटना सलग घडल्या असून त्याबाबत महापौर माळवी यांनी पोलिसांमध्ये तक्रारही केली आहे. नगरसेवकांविरूध्द तक्रार करून तीन दिवस झाले आणि घरावर दगडफेक होऊन दोन दिवस झाले तरीही अद्याप पोलिसांनी कोणावरही कारवाई केलेली नाही. यामुळे पोलिसांच्या तपासाबाबत माळवी समर्थकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. तर माळवी यांच्या घरावर दगडफेक झाली की हा एक स्टंट होता हे शोधून काढण्याची मागणीही दुसऱ्या गटाकडून होत आहे. यामुळे हे सारे प्रकरण नव्या राजकीय वादाला निमंत्रण देणारे ठरत आहे.

Story img Loader