मागील आठवडाभरात जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाल्याचे समोर आले आहे. यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत दोन ठिकाणी तर बाभूळगाव पोलीस ठाण्यांतर्गत एका ठिकाणी या घटना घडल्या. या हल्ल्यांमुळे पोलिसांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याने संतप्त झालेल्या मद्यपी तरुणाने चक्क दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. एवढेच नव्हेतर जमादाराचा गणवेशही फाडला. ही घटना शुक्रवारी यवतमाळ नजीकच्या हिवरी या गावात घडली. यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यातील जमादार सुरेश झोटींग आणि शिपाई खुशाल राठोड हे दोघे हिवरी येथे एका प्रकरणाच्या तपासासाठी गेले होते. तेथून परतत असताना रस्त्याच्या मध्ये उभे असलेले वाहन बाजूला घेण्यावरून त्यांनी विशाल आनंदराव गुरुभेले (२६) रा. हिवरी यास हटकले. त्यावरून सदर आरोपीने पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी झालेल्या झटापटीत जमादार झोटींग यांचा गणवेश आरोपी विशाल याने फाडला. त्यानंतर जमादार झोटींग व शिपाई राठोड यांनी आरोपीस ताब्यात घेतले. विशालविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात उपस्थित केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

बाभूळगाव येथेही असाच प्रकार गुरूवारी घडला. अपघातग्रस्त वाहन घेवून येत असताना पोलीस कर्मचारी प्रविण खंडारे यांना यवतमाळचा कुख्यात गुंड अक्षय राठोड आणि त्याच्या टोळीतील सात जणांनी मारहाण केली. बाभूळगाव बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या नितीन सुरेश मांगुळकर यांचा मोबाईल हिसकावून फेकून दिला. या घटनेनंतर अक्षय राठोड, आकाश गायगोले, आशिष दांडेकर, वैभव जांभुळकर या चौघांना पोलिसांनी अटक केली. इतर चार आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले. या चौघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचेच एक पथक बुधवारी जोडमोहा येथे जुगारावर धाड घालण्यासाठी गेले होते. यावेळी पथकातील जमादार सुरेश डाखोरे, शिवाजी पाटील आणि गृहरक्षक दलाच्या दोन जवानांना आरोपी पंकज दगडू राठोड (२७), सुनील राठोड (३०), देवानंद चव्हाण (४०), जवाहर किसन जाधाव (३५) आणि त्यांच्या १५ साथीदारांनी मारहाण केली. शिवाय यवतमाळकडे जाण्याचा त्यांचा मार्गही रोखून धरण्याचा प्रयत्न केला. या सर्व आरोपींविरुद्ध यवतमाळ ग्रामीण पोलीसांनी गुन्हा नोंदविला. बुधवार, गुरूवार आणि शुक्रवारी असे सलग तीन दिवस पोलिसांवर हल्ले झाल्याने पोलिसांनाच सुरक्षेची गरज तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.