पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे आज अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळपासून या ठिकाणी राजकीय नेते मंडळींसह राज्यभरातून आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर, या जयंती सोहळ्यावरूनही राजकारण दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज चौंडी येथे आहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाचे दर्शन घेतले आणि आयोजित कार्यक्रमास हजेरी लावली. यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. तर दुसरीकडे हा कार्यक्रम संपेपर्यंत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत हे देखील चौंडीला दाखल होण्या अगोदर त्यांचा वाहनांचा ताफा पोलिसांनी चौंडीच्या सीमेवरच रोखून धरला होता. यामुळे बराच गदारोळ देखील पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

माध्यमांनी प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडीला नेहमी कुठलाही पक्ष अभिनिवेश न ठेवता साजरी केली जाते. सर्व प्रकारचे लोक त्या ठिकाणी येतात. पण मला असं वाटतं की यावेळी सरकारी तंत्राचा उपयोग करून, या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी हायजॅक करण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. हे अत्यंत चुकीचं आहे.”

“रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनी कायदा लिहिलाय का?,” पोलिसांनी चौंडीच्या वेशीवर रोखल्यानंतर पडळकरांचा संताप

तसेच, “राम शिंदे जे स्वत: पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचे थेट वंशज आहेत, त्यांना देखील तिथे त्रास देण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर जे खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक आहिल्यादेवींच्या विचारांवर चालातात, त्यांना अडवण्यात येत आहे. मला हे समजतच नाही की अशाप्रकारे कब्जा करण्याचं कारण काय आहे? अशाप्रकारचं पर्व हे राष्ट्रीय पर्व असतं. सगळ्यांनी मिळून साजरं करायचं असतं. पक्षाच्या पलीकडे जाऊन साजरं करायचं असतं. इथे मात्र ते हायजॅक करण्याचा प्रयत्न होतोय, तो योग्य नाही. मला असं वाटतं या संदर्भात गांभीर्याने विचार झाला पाहिजे आणि अशाप्रकारचं हायजॅकींग बंद झालं पाहिजे.” असंही यावेळी फडणवीसांनी म्हटलं.

Story img Loader