वर्धा मार्गावरील घटना
नागपूर : मद्यधूंद ट्रक चालकाने नाकाबंदीवरील पोलीस निरीक्षकांसह तिघांवर ट्रक चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
वर्धा मार्गावरील परसोडी भागात मंगळवारी पहाटे ३ वाजता ही घटना घडली. नवीन वर्षांच्या स्वागताला गालबोट न लागण्यासाठी पोलिसांनी शहरात ३१ डिसेंबरला कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. बेलतरोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय तलवारे, शिपाई व्यंकट गंथाळे व चालक सुखदेव वटाणे हे वर्धा मार्गावर परसोडी परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, एक ट्रक संशयास्पद दिसले असता त्याला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ट्रक चालकाने त्यांच्या अंगावर ट्रक चढवले. यात तिघेही जखमी झाले. त्यानंतर जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती आहे. चाफे असे ट्रक चालकाचे नाव आहे.