नितीन गडकरींच्या आकस्मिक राजीनाम्याने त्यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपुरातील कार्यकर्त्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गडकरी राजीनामा देतील, याची साधी कुणकुणदेखील महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना नव्हती. रात्री नऊनंतर वेगवान घडामोडी घडल्या आणि सारेच कार्यकर्ते स्तब्ध झाले. गडकरींच्या दुसऱ्या टर्मसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर गडकरींनी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा अर्ज भरण्याची तयारी केली होती. आता गडकरींचे राजकीय भवितव्यच पणाला लागले आहे मात्र, लोकसभेची पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीला गडकरी पाठ दाखविणार नाहीत, असे संकेत मिळाले आहेत. अध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळे गडकरींच्या नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांच्या निकटस्थांनी म्हटले आहे.
मुंबईत मंगळवारी म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यक्रमासाठी गेले असताना गडकरींनी भैय्याजी जोशी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी संपर्क साधला. ही चर्चा निर्णायक ठरली आणि त्यानंतर राजीनाम्याचा निर्णय गडकरींना घ्यावा लागला. यासाठी विदर्भातील गडकरी समर्थकांनी काँग्रेसप्रणित युपीए सरकारला दोष दिला आहे. यादरम्यान नागपूरचे काँग्रेस खासदार तसेच गडकरींचे राजकीय विरोधक व २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील संभाव्य प्रतिस्पर्धी विलास मुत्तेमवार यांनी गडकरींच्या राजीनाम्यावर दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे.  
पूर्ती गैरव्यवहारावरून आरोप झाले तेव्हाच गडकरींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असता तर त्यांची किंमत राहिली असती, असे मुत्तेमवार यांनी म्हटले आहे. २०१४ ची लोकसभा निवडणूक मुत्तेमवार विरुद्ध गडकरी अशीच रंगणार असल्याचा पूर्वअंदाज बांधण्यात आला आहे. राजीनामा दिल्याने गडकरींभोवताल गेली तीन वर्षे असलेले राष्ट्रीय अध्यक्षपदाचे वलय  आगामी वर्षभरात पार उतरून जाणार असल्याने गडकरींची दावेदारी तेवढी सक्षम राहणार नाही, असा काँग्रेसजनांचा होरा आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पायउतार व्हावे लागलेले गडकरी हे भाजपचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले आहेत त्यामुळे निवडणूक प्रचार करताना त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपांचे शस्त्र काँग्रेस पक्ष वापरेल, याचे संकेत मिळाले आहेत. राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद, भाजपचे प्रदेशाध्यक्षपद, विधान परिषदेच्या सलग टर्म मिळालेले गडकरी अद्याप सार्वजनिक निवडणुकीत उतरलेले नाहीत. गडकरी सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. स्वत:ची राष्ट्रीय प्रतिमा निर्माण करण्यासाठी त्यांना लोकसभा निवडणूक जिंकणे भाग आहे. परंतु, बदललेल्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी अनुभवी काँग्रेसजनांनी आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. गडकरींना लोकसभेवर निवडून जाण्यासाठी मुस्लिम आणि रिपाइं मतांचीही आवश्यकता राहणार आहे.
उद्या, गुरुवारी, गडकरी प्रमुख प्रवर्तक असलेली अ‍ॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनी सुरू होत असून गडकरींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी विमानतळावर वा निवासस्थानी पुष्पगुच्छ घेऊन येऊ नये वा ढोलताशे वाजवून कोणत्याही प्रकारे आपले स्वागत करू नये, अशा स्पष्ट सूचना गडकरींनी दिल्लीतून दिल्याचे समजते.

‘संघाचा हात नाही
गडकरींचा राजीनामा घेण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा संघाचे अ.भा. प्रसिद्धी प्रमुख मनमोहन वैद्य यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना इन्कार केला. गडकरींचा राजीनाम्याचा निर्णय भाजपचा अंतर्गत निर्णय आहे. यात संघाची कोणतीही ढवळाढवळ नाही. गडकरींचा दुसरी टर्म मिळावी, असा संघाचा आग्रह जरूर होता परंतु, याबद्दलचा अंतिम निर्णय पक्षालाच घ्यायचा होता. त्यामुळे गडकरींच्या राजीनाम्यात संघाचा हात असल्याच्या बातम्यांत अर्थ नाही,असे ते म्हणाले.

Story img Loader