विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पालघर जिल्हा प्रशासनाला एक महत्त्वपूर्ण सूचना केली आहे.पालघर जिल्ह्यातील ९५ टक्के गावं करोना मुक्त झाली असून एकल व विधवा महिला यांचं पुनर्वसन आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नोंदणी करण्याबाबत नीलम गोऱ्हे यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. जिल्हा विकास कार्यक्रमांमध्ये अंतर्भूत न होणाऱ्या कामगार, परिवहन, आदिवासी विकास, नाभिक, एकल महिला, रोजगार हमी, रिक्षा चालक, फेरीवाले इतर मागास प्रवर्ग, लोककलाकार यांच्यासह नऊ विभागांचा आढावा दौरा पूर्ण झाल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या कि, “करोनाच्या संक्रमणात जिल्ह्यात एकूण ५५१ नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात ४६२ पुरुषांचा समावेश आहे. तर जिल्ह्यातील २६२ बालकांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला असून त्याकरिता राज्य शासनाने जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी सुरू आहे.” त्याचसोबत कामगार कल्याण विभागाने करोना काळात वितरीत केलेल्या १८ कोटी रुपयांच्या मदतीसह शासनाच्या विविध योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट २७ कोटी रुपयांचा निधी वेगवेगळ्या योजनेअंतर्गत जमा झाला असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी विशेष कार्यक्रम

जिल्ह्यातील असंघटित कामगारांची नोंदणी वाढवण्यासाठी ५ ते १० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे असंघटित कामगारांना आगामी काळात विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल, असे नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलं.

लसींच्या उपलब्धतेबाबत लोकसभा अध्यक्षांकडे पाठपुरावा करणार

नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या कि, जिल्ह्याला कमी प्रमाणात लस मात्रा उपलब्ध होत असल्याचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधींनी आमच्या लक्षात आणून दिलं आहे. त्यामुळे, या संदर्भात लोकसभा अध्यक्षांकडे लस उपलब्धतेबाबत पाठपुरावा करू असं त्यांनी सांगितलं. स्थलांतरित कामगारांना करोना लस उपलब्ध करून दिल्यास अशा नागरिकांना आजाराचा धोका कमी होईल, असं देखील त्या यावेळी म्हणाल्या. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत गेल्या वर्षभरात ६० कोटी ५० लाख रुपयांची मंजूर देण्यात आल्याकडे देखील यावेळी नीलम गोऱ्हे यांनी लक्ष वेधलं आहे.

पुनर्वसनासाठी महिलांना कृषी विषयक आणि कौशल्य विशेष प्रशिक्षण

जिल्ह्यासमोर विधवा महिला तसेच एकल माता यांच्या पुनर्वसनाचं आव्हान असून याकरिता उपसमिती गठीत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना कृषी विषयक मार्गदर्शन तर शहरी भागातील एकल मातांना कौशल्य विशेष प्रशिक्षण देण्याचं सूचित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अशा महिलांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी त्यांना विधी सेवा विभागातर्फे मार्गदर्शन व मदत द्यावी व त्यांच्या मालमत्तेचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्यासंदर्भात देखील नीलम गोऱ्हे यांनी सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील बालविवाह व बालमजुरी रोखण्यासाठी जिल्ह्यातील पोलिसांनी कारवाई करावी व या कामी महिला दक्षता समिती व सामाजिक संघटनेची मदत घ्यावी असेही त्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचित केलं आहे.

Story img Loader