राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षांतर्गत नाराजांची ‘तुम्ही आता काम करा, वेळेनुसार बघू’ असे सांगत मागील वेळेप्रमाणेच उदारीच्या आश्वासनावर बोळवण केल्याने अस्वस्थ नेत्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे पक्षांतर्गत नाराज माजी आमदार व काही प्रमुख पदाधिकारी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ‘ताकद’ दाखवण्याच्या विचारात असून, पवारांची पाठ फिरताच उमेदवार सुरेश धस यांच्यासमोरील अडचणी वाढल्याचे दिसत आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातून भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीने धस यांना मदानात उतरविल्यानंतर शरद पवार यांनी प्रचार दौरा रद्द करून गारपीटग्रस्तांच्या भेटी घेत जिल्हा पिंजून काढला. मात्र, ५ वर्षांपूर्वी पक्षात घेऊन राजकीय पुनर्वसनाचा दिलेला शब्द पूर्ण न झाल्यामुळे नाराज माजी आमदार व पदाधिका-यांनी अलिप्त राहण्याची भूमिका घेतली. धस यांनी या अस्वस्थ नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी पवार यांची भेट घडवण्याचा प्रयत्न फारसा फलदायी ठरला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाच वर्षांपूर्वी आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांच्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे व साहेबराव दरेकर यांच्या घरी जाऊन पवार यांनी ‘थ्री डीं’ची मोट बांधून राजकीय पुनर्वसनाचा शब्द दिला होता. मात्र, निवडणुकीनंतर पवारही विसरले. दुसरीकडे स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत स्पर्धक सक्षम होऊ नये, या साठी धस यांनी दोन्ही नेत्यांची राजकीय कोंडी करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यामुळे मागील वर्षभरापासूनच हे दोन्ही माजी आमदार स्थानिक पातळीवर धस यांच्यापासून फटकून आहेत. धस यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या दोन्ही माजी आमदारांनी आपली नाराजी जाहीरपणे मांडण्यास सुरुवात केली. त्यामुळे धस यांनी पुन्हा धोंडे-दरेकरांना सोबत घेण्यासाठी पवारांनी चर्चा करावी, या साठी प्रयत्न केले. पवार यांच्या निरोपानंतर धोंडे, दरेकर कार्यकर्त्यांना जमवून वाट बघत बसले. पण पवार यांनीही ऐनवेळी आष्टीला जाण्याचे टाळून बारामती गाठली.
मंगळवारी रात्री बारामतीत धोंडे, दरेकर यांच्यासह बीडचे माजी आमदार राजेंद्र जगताप यांनीही पवारांची भेट घेतली. या वेळी मागच्या वेळेप्रमाणेच पवारांनी पुन्हा भविष्यात संधी देण्याच्या आश्वासनावर बोळवण केली. बीड मतदारसंघातही राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांचे काम करावे, या साठी आमदार विनायक मेटे, माजी आमदार राजेंद्र जगताप, जनार्दन तुपे यांचे मनोमिलन केले होते. क्षीरसागर पालकमंत्री झाले. पण त्यांच्याकडून मेटे, जगताप, तुपे यांना ५ वर्षांत दुजाभावच सहन करावा लागला. क्षीरसागर यांच्या कार्यपद्धतीवर या तिन्ही नेत्यांनी अनेकदा उघड नाराजी व्यक्त केली. मेटे यांनी तर बंडच पुकारले. जगताप व तुपे हे दोन्ही माजी आमदारही कोणती भूमिका घ्यावी, या विचारात आहेत.
माजलगाव मतदारसंघातही माजी आमदार राधाकृष्ण होके यांच्या घरी जाऊन ५ वर्षांपूर्वीच शरद पवार यांनी पाटील यांना आमदार सोळंके यांच्यासोबत जोडले होते. या ठिकाणीही सोळंके यांनी पाटील यांना त्रास देण्याची एकही संधी सोडली नाही. पवार यांची पाठ फिरताच राष्ट्रवादीतील नाराजांचे एकत्रीकरण व त्यांच्या भूमिकेमुळे धस यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Story img Loader