मराठा आरक्षणावरून सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सत्कार, श्रेयवाद व आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत, तर शिवसंग्रामने महाराष्ट्र सरकारचा निषेध केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सह्य़ाद्रीचा वाघ समजला जाणारा मराठा समाज नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. मराठा आरक्षणासाठी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. सरकारने नेमलेल्या या समितीने आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून सरकारला अहवाल सादर केला आहे. पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळाने त्याला अद्यापि मान्यता दिलेली नाही.
उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा हक्क पाहता त्यांचा सत्कार होणार होता. हा जाहीर सत्कार नुकताच करण्यात आला. मराठा समाजाला राणे यांनीच आरक्षण देण्यास राजकीय बळाचा वापर केल्याचे जाहीर करण्यात आले.
लोकसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत मराठा आरक्षण जाहीर झाले नसल्याने निवडणुकीवर डोळा ठेवूनही भूमिका घेण्यात आल्याची टीका होऊ लागली. माजी आमदार पुष्पसेन सावंत यांनी तशी टीका केली. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य आहेत. शिवाय शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांनी मराठा समाजाची दिशाभूल थांबवा, असा इशारा दिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मराठा समाजाबद्दल प्रथमच जाहीर चर्चा सुरू झाली आहे. दऱ्याखोऱ्यात सह्य़ाद्रीच्या पायथ्याशी राहणारा मराठी समाज वाघच समजला जातो. त्यामुळे हा मराठा समाज विखुरलेला असला तरी यावेळी मात्र मतदानाचा हक्क बजावताना वाघासारखाच राहील, असे बोलले जात आहे. मराठा समाजास आरक्षण नाकारून काँग्रेस-राष्ट्रवादीने घोर फसवणूक केली आहे, असे शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांनी म्हटले आहे. गेली पाच वर्षे मराठा आरक्षण २५ टक्के मिळावे म्हणून शिवसंग्रामने राष्ट्रीय नेते आम. विनायक मेटे, राज्य अध्यक्ष तानाजी शिंदे व मराठा समाज संघटना भांडत आहेत, पण मंत्री छगन भुजबळ विरोध करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Story img Loader