आकर्षक मुखपट्टे घेण्याकडे वाढता कल; संकटात सापडलेल्या कंपन्यांना आर्थिक बळ

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई : करोनाचे संकट कायम राहणार असल्याने पुढील काही काळ मुखपट्टय़ा या आपल्या जीवनाच्या अविभाज्य भाग बनणार आहेत. रंगीबेरंगी, रेखाटने असलेले आकर्षक मुखपट्टी वापरण्याचा कल येत आहे. त्यामुळे नामांकित नाममुद्रा असलेल्या कंपन्यांनी आता विविध रंगाचे आकर्षक मुखपट्टय़ांची निर्मिती सुरू केली आहे. विशेष म्हणजे टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या  कंपन्यांना आर्थिक बळ मिळाले आहे.

आपल्या व्यक्तिमत्त्वानुसार किंवा कपडय़ांच्या निवडीनुसार मुखपट्टे खरेदी करण्याचा कल येऊ  लागला आहे.  मुखपट्टय़ांवर कार्टुन, कोट्स, हॅशटॅग, माव्‍‌र्हेल सिरीज, भौमितिक आकृत्या, डुडल इत्यादी रचना आहेत. यांच्या किमती अगदी २० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत आहेत. तसेच हे मुखपट्टे तान्ह बाळं, लहान मुले आणि मोठय़ांसाठी अशा आकारांमध्ये उपलब्ध आहेत.   एन ९५ मुखपट्टय़ांना जास्त मागणी असल्यामुळे हे मुखपट्टेदेखील रंगीत चित्रांमध्ये उपलब्ध आहेत. दुचाकीवर बसून घालण्यासाठी, कार्यालयामध्ये घालण्यासाठीचे असे मुखपट्टे येत आहेत. भविष्यात आपल्या पेहरावाला शोभेल अशा मुखपट्टय़ाही सोबत  दिला जातील. ऑनलाइन मुखपट्टा आणि ड्रेसचे कॉम्बो अशी विक्री होईल, असे फॅशन डिझायनर विधी सावर्डेकर यांनी सांगितले. बिलिव्ह मास्क, अर्बस्टन योगी, यंग प्रिंटसारख्या कंपन्या आज मुखपट्टय़ांची ऑर्डर दूरध्वनीवरून, व्हॉट्सअपवरून घेत आहेत.  रंगीबेरंगी, विविध रचनेचे मुखपट्टे सुती, लिनन, डेनिम चिनो, गॅबार्डिन अशा कापडापासून बनवले जातात. ३ ते ४ थरांचे हे मुखपट्टे  प्लिट्स आणि नाक बंद अशा प्रकारांमध्येच प्रिटेंड कापडाचे बनवतात किंवा नंतर पट्टय़ांना चित्रकार हँडपेंट करतात किंवा डिजिटल प्रिंटही केले जाते. ‘मुखपट्टय़ांना एक्सेसरीजचा भाग म्हणून कलात्मकरित्या सादर केले जाते’ असे आई टोकरीचे विपणन प्रमुख नितीन पामनानी यांनी सांगितले. कस्टमाईज मुखपट्टय़ांची बऱ्याच विक्री बऱ्याच संकेतस्थळांवर होत आहे. यात मास्कवर आपल्या आवडीची रचना डिजिटल प्रिंटद्वारे करून मिळते. तरुणांचा कल मुखपट्टे कस्टमाईज करून घेण्याकडे आहे. यावर ते सुपरहिरो, टोपणनाव, टॅटू चित्र प्रिंट करून घेतात, असेही पामनानी यांनी सांगितले.

ऑनलाइन विक्री

रंगीत कापड, ब्लॉक प्रिटींग केलेले कापड पडून राहण्यापेक्षा याच कापडांचा वापर मुखपट्टे बनवण्यासाठी केला. यामुळे पांढरे, काळे आणि हिरवे या पारंपरिक मुखपट्टय़ांच्या रंगांना छेद दिला गेला आणि ताजे, डोळ्यांना सुखावणारे रंग, रचनांचे मुखपट्टे तयार झाले. यामुळे आमचे पडून राहिलेली कापडे, कच्चा माल वापरला गेला. तसेच टाळेबंदीमध्ये कामकरी वर्गाला पगार मिळाला, ही माहिती निर्मल एंटरप्रायझेसच्या व्यवस्थापन प्रमुख अनुराधा महेश्वरी यांनी दिली.  ब्रँडच्या संकेतस्थळावरून, अमेझॉन, फ्लिपकार्ट तसेच इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या समाज माध्यमावरून या मुखपट्टय़ांची विक्री सुरू आहे.

लहान-लहान गावांमधून स्थानिक विणकाम, शिवणाम करणाऱ्यांना एकत्र करून ऑनलाइन कपडे विक्रीचे लघुउद्योग करणाऱ्या खूपशा फॅशन डिझायनरनेसुद्धा मुखपट्टे बनवून विकत आहेत. ‘आई टोकरी’, ‘तिजोरी’, ‘रेझिन्स’, सामान्य संरक्षणसाठी, सुती, ३ ते ४ आवरणांचे वेव अँड नॉट्स, रस्ट ऑरेंज सारख्या अनेक लघु उद्योग तसेच ‘अलन सोली’, ‘शॉपर स्टॉप’, ‘मॅक्स फॅशन’, ‘फॅब इंडिया’, ‘आदित्य बिर्ला’ फॅशन अँड रिटेल ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मदेखील मुखपट्टे विकत आहेत. याशिवाय अमेझॉन, प्लिपकार्ट, मंत्रा, स्न्ॅपडिल, बेवकूफ, क्बफॅक्टरी, लाईमरोड इत्यादी मोठी ई-कॉमर्स संकेतस्थळेही मुखपट्टय़ांची विक्री करत आहेत. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बनवणाऱ्या शाऊमी कंपनीनेसुद्धा प्रदूषणापासून संरक्षण करणारे मुखपट्टे ऑनलाईन बाजारात आणले आहेत.

घरच्या घरी मुखपट्टी

‘घरच्या घरी मास्क बनवा’, मशिनशिवाय मास्क बनवा’, ‘मास्क डीआयवाय’, ‘मेक युअर ओन मास्क’ असे  व्हिडीओ यूटय़ुब, टिकटॉक, व्हॉट्सअपवर, इन्स्टाग्रामवर प्रसारीत झाले आहेत. ते पाहून अनेकांनी घरबसल्या मुखपट्टय़ा तयार केल्या आहेत.    त्याचबरोबर यूटय़ुब आणि ई शिक्षण संकेतस्थळांवर  क्लासेसही सुरू झाले आहेत.  मोफतसह तर काही ठिकाणी ३ ते ७ हजार एवढी फी आहे. ऑनलाइन प्रशिक्षणही सुरु आहे.

Story img Loader