वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी एकाच मंचावर उपस्थित होते. ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या उद्घाटनप्रसंगी दोन्ही नेते एकत्र आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याबाबत संकेत दिले आहेत. जेव्हा निवडणुका जाहीर होतील, तेव्हा आम्ही एकत्र येऊ, असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं.
या विधानानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते अतुल भातखळकर यांनी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे परस्परविरोधी विचारांचे असून आपला उरलेला पक्ष वाचवण्यासाठी ते एकत्र येत आहेत, अशी टीका भातखळकरांनी केली आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत ही टीका केली आहे.
हेही वाचा- मुंबईत ठाकरे-शिंदे गट पुन्हा आमने-सामने; विकासकामाच्या श्रेयवादावरून जोरदार घोषणाबाजी
दरम्यान, त्यांनी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात यापूर्वी झालेल्या वादाचाही उल्लेख केला. संबंधित व्हिडीओत भातखळकर म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आले नाहीत. त्यांचा उरलेला पक्ष वाचवण्यासाठी ते एकत्र आले आहेत. ‘रिडल्स ऑफ रामायणा’च्या वादावरून प्रकाश आंबेडकर जेव्हा हुतात्मा चौकात गेले होते. तेव्हा शिवसेनेनं तो हुतात्मा चौक गोमूत्राने स्वच्छ केला होता. ही बाब प्रकाश आंबेडकर विसरले असतील. पण महाराष्ट्राची जनता विसरली नाही.”
हेही वाचा- “तो माणूस कालपर्यंत तुरुंगात होता, तो गुन्हेगार…” चंद्रकांत पाटलांची राऊतांवर खोचक टीका!
“घरात नाही पीठ आणि कशाला हवं विद्यापीठ, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यात प्रचार केला होता. हेही आंबेडकरी जनता विसरलेली नाही. त्यामुळे दोघंही परस्परविरोधी विचारांचे लोक केवळ स्वत:चं अस्तित्व वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यासाठी ते आपापल्या पूर्वज महापुरुषांच्या नावाचा वापर करत आहेत. हे न ओळखण्याइतकी जनता मूर्ख नाही” अशी टीका अतुल भातखळकरांनी केली आहे.