Atul Bhatkhalkar on Raj and Uddhav Thackeray Alliance : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच एससीईआरटीने नुकताच ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४’ मंजूर केला असून येत्या शैक्षणिक वर्षापासून तो लागू केला जाणार आहे. यानुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा शिकणं सक्तीचं करण्यात आलं आहे. हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना (ठाकरे) हे पक्ष उभे ठाकले आहेत. अशातच दोन्ही पक्षांचे प्रमुख म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवेसना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

हिंदीच्या सक्तीविरोधात, मराठीच्या मुद्द्यावर आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही आपसातील किरकोळ वाद मिटवून एकत्र येण्यास तयार आहोत, असं काहीसं मत दोन्ही नेत्यांचं आहे. त्यामुळे आता राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेला बळ मिळालं आहे. यावर दोघांचेही विरोधक व मित्रांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपा नेते अतुल भातखळकर याबाबत म्हणाले की ते दोघे एकत्र येऊ इच्छित असतील तर त्यांनी यावं. मात्र यात कुठेही महाराष्ट्राचं हित नाही.

ती युती महाराष्ट्राच्या हिताची म्हणणं चुकीचं : भातखळकर

आमदार अतुल भातखळकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी नेमकी काय अट घातली आहे किंवा राज ठाकरे यांचं त्याबाबत काय मत आहे याची मला कल्पना नाही. मी फक्त एवढंच सांगेन की आपल्या देशात लोकशाही आहे, त्यामुळे कोणीही कोणत्याही पक्षात जाऊ शकतो. कुठलाही पक्ष दुसऱ्या कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी किंवा युती करू शकतो. त्यावर कोणीही आक्षेप घ्यायचं कारण नाही. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर त्यावर भाजपाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. परंतु, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र यायला तयार आहोत असं म्हणणं पूर्णपणे राजकीय आहे.

राज व उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने नाकारलंय : अतुल भातखळकर

भाजपा आमदार म्हणाले, उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने नाकारल्यामुळे आता दोघांनाही असे विचार सुचत आहेत, असं मला वाटतं. त्यांनी आपापल्या अटींवर चर्चा करावी आणि एकत्र यावं. याच्याशी महाराष्ट्राच्या हिताचा काहीच संबंध नाही आणि हीच वस्तुस्थिती आहे. दोघांनाही जनतेने नाकारलं आहे. त्यामुळे त्यांना आता एकत्र येण्याची गरज वाटत असेल. मात्र, इथे महाराष्ट्राचा कोणताही मुद्दा नाही. भाजपा, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांच्या महायुतीचे सरकार उत्तम रीतीने महाराष्ट्राच्या हिताची काळजी घेत आहे.

भातखळकर म्हणाले, राज आणि उद्धव ठाकरे यांनी चर्चा करून त्यांची त्यांची युती, आघाडी करावी. आमचा त्यावर काही आक्षेप नाही. ज्यांना आघाड्या करायच्या आहेत त्यांनी जरूर कराव्यात. परंतु, महाराष्ट्र काही थांबणार नाही. महायुतीचे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गतीने महाराष्ट्राचा विकास करेल.