Actor Atul Parchure Died : चतुरस्त्र मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. तीन वर्षांपूर्वी अतुल परचुरेंना कर्करोग झाला होता, कर्करोगावर मात करून ते बाहेर आले होते. मराठी चित्रपटरसिकांनी, परचुरे यांच्या चाहत्यांनी त्यांच्या जिद्दीचं कौतुक केलं होतं. लिव्हरच्या (यकृताच्या) कर्करोगाशी झुंजताना आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या मागे त्यांची आई, पत्नी व मुलगी असं कुटुंब आहे. नाटक, मालिका व चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. अतुल यांच्या जाण्याने मराठी कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. दरम्यान, चित्रपट क्षेत्रातील त्यांचे मित्र, सहकलाकार व त्यांचे चाहते समाजमाध्यमांद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. पाठोपाठ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील परचुरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिंदे यांनी ‘एका चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एग्झिट’ अशी पोस्ट समाजमाध्यमांवर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली देदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. तरुण तुर्क म्हातारे अर्क, नातीगोतीसारखी नाटकं असोत किंवा पु. ल. देशपांडे यांचा शाब्दिक, वाचिक विनोद असो, अतुल परचुरे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी त्यात गहिरे रंग भरले. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या जाण्यामुळे मराठीतला एक अभिजात अभिनेता हरपला आहे. हे नुकसान भरुन येण्यासारखे नाही. परचुरे यांच्या हजारो चाहत्यांपैकी एक या नात्याने कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो. राज्य सरकारच्या वतीने मी त्यांना श्रध्दांजली वाहतो. ओम शांती”.

हे ही वाचा >> अभिनेता अतुल परचुरेचं निधन, पु.लंची शाबासकी मिळवणारा हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआड

मराठी कलाविश्वावर शोककळा

कॅन्सरवर मात करून अतुल परचुरे यांनी पुन्हा काम करण्यास सुरुवात केली होती. मराठी रंगभूमीवर पुन्हा दाखल झालेल्या सूर्याची पिल्ले या नाटकातही त्यांची भूमिका होती. पण, कॅन्सरनंतरची त्यांची इनिंग दुर्दैवानं फार काळ चालली नाही. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. अष्टपैलू अभिनेता, चांगला मित्र गमावल्याची भावना त्यांच्या सहकलाकारांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atul parchure died cm eknath shinde paid tribute special message asc