Atul Save : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर तब्बल एका आठवड्यानंतर म्हणजे २१ डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटपही जाहीर करण्यात आलं. खरं तर खातेवाटप कधी जाहीर होणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलं होतं. तसेच हिवाळी अधिवेशन हे बिनाखात्याच्या मंत्र्यांविना पार पडल्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर अखेर २१ डिसेंबर रोजी खातेवाटप करण्यात आलं. आता खातेवाटप झाल्यानंतर लगेच महायुतीत पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच? सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणत्या मंत्र्यांकडे जाणार? तसेच कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणत्या पक्षाकडे जातं? हे पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. मात्र, त्याआधीच आता महायुतीत पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. खातेवाटप जाहीर होताच छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार, असं म्हणत मोठा दावा केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. त्यानंतर आता ओबीसी विकास आणि दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांना छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाबाबत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सूचक भाष्य केलं. महायुतीमधील आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असं सूचक विधान मंत्री अतुल सावे यांनी माध्यमांशी बोलताना केलं.
हेही वाचा : “मला वाटते भुजबळांनी पंतप्रधान व्हावे…”, छगन भुजबळांच्या नाराजीवर राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्याचे भाष्य
मंत्री अतुल सावे काय म्हणाले?
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर मोठा विश्वास दाखवला. माझ्यावर तीन-तीन विभागाची जबाबदारी दिली आहे. मी आज आपल्याला विश्वास देतो की येणाऱ्या काळात राज्याच्या प्रगतीसाठी मी करेन. आधी अडीच वर्ष देखील मी मंत्री म्हणून राज्याच्या विकासासाठी काम केलं”, अशी प्रतिक्रिया मंत्री अतुल सावे यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री कोण असेल?
छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? यावर बोलताना अतुल सावे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल”, असं अतुल सावेंनी म्हटलं. तसेच आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये ५२ हजार कोटींचे उद्योग आधी मंत्री असताना आणलेले आहेत. तसेच पाण्याचा प्रश्न आहे तो आम्ही मार्गी लावत आहोत. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याचा विकास हाच आमचा उद्देश असणार आहे, असंही ते म्हणाले.
संजय शिरसाट काय म्हणाले होते?
“गेल्या ४० वर्षांपासून मी शिवसेनेचं काम करतोय. आज मला कष्टाचं फळ मिळालं. अनेक लोकांचे मोर्चे काढले. अनेकांचे निवडणुकीसाठी अर्ज भरले. पण आज त्याच चौकात माझं स्वागत होतंय, हा सर्वात मोठा आनंद आहे. आज माझे सर्व कार्यकर्ते खूष आहेत. मंत्रिपदाची संधी मला लोकांची सेवा करण्यासाठी मिळाली”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होणार? याबाबत विचारलं असता छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार, पण यासंदर्भातील औपचारीक घोषणा बाकी आहे”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं.