ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या देशभर गाजलेल्या आंदोलनाची साक्षीदार ठरलेल्या स्कॉर्पिओ या गाडीचा रविवारी सकाळी ९ लाख ११ हजार रुपयांना लिलाव करण्यात आला. श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथील हजारे यांचेच कार्यकर्ते प्रवीण ऊर्फ अतुल लक्ष्मण लोखंडे यांनी हे वाहन खरेदी केले.
 स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी समितीने हे वाहन विकून नवे वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या पाश्र्वभूमीवर हे वाहन लिलाव पद्घतीने विकण्याचा निर्णय घेण्यात आला.  लिलावात निष्कलंक व्यक्तीनेच खरेदी करण्याची अट घालण्यात आली होती.
कार्यकर्त्यांप्रमाणे साथ -हजारे
१ लाख ८३ हजार किमी. प्रवास केलेल्या या वाहनाने कार्यकर्त्यांप्रमाणे साथ दिल्याची प्रतिक्रिया हजारे यांनी लिलावानंतर दिली. कार्यकर्त्यांच्या देणगीतून खरेदी करण्यात आलेल्या या वाहनामुळे जनतेच्या हिताचे अनेक कायदे करण्यासाठी मदत
झाली. आंदोलनाचा कार्यकर्ता असलेल्या प्रवीणकडे हे वाहन जात आहे.  एका कार्यकर्त्यांकडून दुसऱ्या कार्यकर्त्यांकडे हे वाहन जात असून यापुढील काळातही या वाहनाचा वापर समाजसेवेसाठीच होईल असा विश्वास हजारे यांनी व्यक्त केला.  

वाहनाचे पावित्र्य राखू – लोखंडे
आपणावर पूर्वीपासूनच हजारे यांच्याच विचारांचा प्रभाव असल्याचे सर्वोच्च बोली बोलणारे प्रवीण लोखंडे यांनी सांगितले. हजारे यांच्या अनेक आंदोलनांत मी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. वडील व आजोबांमुळे अण्णांचे हे वाहन खरेदी करण्याचा आपण निर्णय घेतला. हजारे यांच्या या वाहनाचे पावित्र्य जपले जाईल असे सांगतानाच आपल्या मित्रपरिवाराने हजारे यांना हवे ते वाहन घेऊन देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु हजारे यांनी त्यास नकार दिल्याने सर्वोच्च बोली बोलून आपण हे वाहन खरेदी केले.

Story img Loader