ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या देशभर गाजलेल्या आंदोलनाची साक्षीदार ठरलेल्या स्कॉर्पिओ या गाडीचा रविवारी सकाळी ९ लाख ११ हजार रुपयांना लिलाव करण्यात आला. श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथील हजारे यांचेच कार्यकर्ते प्रवीण ऊर्फ अतुल लक्ष्मण लोखंडे यांनी हे वाहन खरेदी केले.
स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी समितीने हे वाहन विकून नवे वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या पाश्र्वभूमीवर हे वाहन लिलाव पद्घतीने विकण्याचा निर्णय घेण्यात आला. लिलावात निष्कलंक व्यक्तीनेच खरेदी करण्याची अट घालण्यात आली होती.
कार्यकर्त्यांप्रमाणे साथ -हजारे
१ लाख ८३ हजार किमी. प्रवास केलेल्या या वाहनाने कार्यकर्त्यांप्रमाणे साथ दिल्याची प्रतिक्रिया हजारे यांनी लिलावानंतर दिली. कार्यकर्त्यांच्या देणगीतून खरेदी करण्यात आलेल्या या वाहनामुळे जनतेच्या हिताचे अनेक कायदे करण्यासाठी मदत
झाली. आंदोलनाचा कार्यकर्ता असलेल्या प्रवीणकडे हे वाहन जात आहे. एका कार्यकर्त्यांकडून दुसऱ्या कार्यकर्त्यांकडे हे वाहन जात असून यापुढील काळातही या वाहनाचा वापर समाजसेवेसाठीच होईल असा विश्वास हजारे यांनी व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा