नगर : समाजमाध्यमातून ध्वनिफीत प्रसारित करून मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, त्यांचे चिरंजीव युवानेते उदयन गडाख यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली, या आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आणि घटनेच्या निषेधार्थ आज, बुधवारी पुकारलेल्या ‘नेवासा बंद’ला तालुक्यात सर्वत्र उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावागावातून कडकडीत बंद पाळण्यात आला.
नेवासा शहरात शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांनी नेवासा तहसील कार्यालयावर मूक मोर्चाने जाऊन तहसीलदार रुपेश सुराणा, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांना निवेदन दिले. मंत्री गडाख यांच्या आवाहनानंतर व निवेदन दिल्यानंतर बाजारपेठ पुन्हा सुरू करण्यात आली. बंद शांततेत पार पडला.
व्यापारी संघटना, गडाख समर्थक व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बंदची हाक दिली होती. त्याप्रमाणे पंचायत समितीपासून कार्यकर्ते मूकमोर्चात सहभागी झाले होते. या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले, की गडाख यांचे स्वीय साहायक राहुल राजळे यांच्यावर गोळीबार करून झालेल्या प्राणघातक हल्यानंतर मंत्री शंकरराव गडाख, चिरंजीव उदयन गडाख यांना जिवे मारण्याचे कट कारस्थान समाजमाध्यमाचे प्रसारित ध्वनिफितीतून पुढे आले. त्यामुळे नागरिक दहशतीखाली असून सामाजिक शांतताही धोक्यात आली आहे.
मंत्री पदावरील व्यक्तीवर अशा प्रकारे हल्ला होणे ही बाब निंदनीय आहे. त्यामुळे समर्थकांनी आक्रमक भूमिका घेऊन बंदची हाक देऊन निषेध नोंदवला आणि आरोपी शोधून काढले पाहिजे त्यांना शिक्षा करावी, अशी मागणी केली.
दरम्यान, नेवासा तालुक्यातील गावागावातून ग्रामसभा घेऊन, ग्रामसभेतील निषेधाचे ठराव जमा करण्यात आले आहेत. तालुक्यातील दिघी ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच तसेच पदाधिकाऱ्यांनी आज नेवासा पोलीस ठाण्यात सदरचे ठराव जमा केले.
नेवासा तालुक्याला ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, लोकनेते कै. मारुतीराव घुले व कै. वकीलराव लंघे अशा सुसंस्कृत राजकारण्यांचा वारसा असल्याने सध्याच्या ध्वनिफितीतील जिवे मारण्याच्या कारस्थान प्रकरणाने तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सर्व पक्षीयांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. – महेश मापारी, ज्येष्ठ कार्यकर्ते, नेवासा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा