औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूरजवळ दोन कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात चार वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला आहे तर ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत. मृत चौघेही नाशिकमधले आहेत. सोमवारी सकाळी हा अपघात घडला.
वैजापूरजवळील शिवराय फाट्यानजीक दोन कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात चार वऱ्हाडी ठार झाले असून ३० ते ३५ जण जखमी झाले. जखमींपैकी काहींना वैजापूर येथीलच ग्रामीणसह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मृत चौघेही नाशिक जिल्हयाच्या अंबडमधील रहिवासी आहेत. जखमी व मृत हे जालना जिल्ह्यातील मंठा येथून लग्न आटोपून रात्री परतीच्या प्रवासास निघाले असता मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
कविता आबासाहेब वडमारे (वय ४०), ललिता पुंडलिक पवार (४५), प्रज्ञा गौतम गायकवाड (१५), मोनु दीपक वाहुळे (वय ८, सर्व रा. गौतम नगर, अबंड औद्योगिक वसाहत परिसर जि. नासिक) असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
शिवराय फाटा येथे मंठा येथून नाशिककडे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारे आयशर व नाशिककडून औरंगाबादकडे जाणाऱ्या आयशरमध्ये धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच आमदार बोरणारे, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती, पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्यासह वैजापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. तातडीने रुग्णवाहिकेव्दारे जखमींना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे दोन महिला, एक युवती व एका मुलास मृत घोषित केले. जखमींपैकी काहींना दोन ते तीन खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.