मागील काही महिन्यांमध्ये वेदान्त फॉक्सकॉन, सॅफ्रन, टाटा एअरबस यासारखे प्रकल्प परराज्यात गेले आहेत. राज्यात होणारी मोठी गुंतवणूक गुजरातसह अन्य राज्यांत गेल्यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. तर राज्यातून बाहेर गेलेले सर्व प्रकल्प हे महाविकास आघाडीच्या काळातील आहेत, असा दावा सत्ताधारी शिंदे गट-भाजपाकडून केला जातोय. असे असतानाच आता भाजपाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. औरंगाबादमधील जायकवाडी येथे फ्लोटिंग सोलार पॅनलाच प्रकल्प उभा करण्यासाठी मी पत्र पाठवले होते. मात्र तुम्हाला या प्रकल्पावर अभ्यासही करता येणार नाही, असे सांगण्यात आले, असे कराड म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा >>> “आधी कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलतो”, महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान; म्हणाले “भारतमाता विधवा…”
“मराठवाड्यातील कोणताही प्रकल्प बाहेर गेलेला नाही. मात्र मराठडवाड्यातील जायकवाडी येथे फ्लोटिंग सोलार उभारण्याचा प्रकल्प व्हावा म्हणून मी प्रयत्न केले. महाविकास आघाडी सरकार असताना मी परवानगी मागत होतो. औरंगाबादचे तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मी पत्र दिलं होतं. त्यांनी मला पत्राच्या माध्यमातून तुम्हाला या प्रकल्पाच्या माध्यमातून अभ्यासही करता येणार नाही, असे सांगितले होते. साधारण १० हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे,” असा दावा भागवत कराड यांनी केला आहे.
हा प्रकल्प २ वर्षांपूर्वी झाला असता तर पाणीपुरवठा योजना तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असता. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू शकली असती, असेही भागवत कराड म्हणाले.
हेही वाचा >>> औरंगाबादकडे ठाकरे गटाचे विशेष लक्ष; अब्दुल सत्तार, संदिपान भुमरेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे घेणार मेळावे
दरम्यान, या आरोपानंतर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबादमधील जनतेला प्रभावित करण्यासाठी भागवत कराड यांचा हा उद्योग सुरू आहे. केंद्राच्या एनटीपीसी विभागाकडून या प्रकल्पाचा प्रस्ताव यायला हवा होता. मात्र भागवत कराड यांनी राज्य सरकारला पत्र लिहिले. तरी केंद्रीय मंत्री असल्याने आम्ही त्यांच्या पत्राची दखल घेतली व एक समिती गठीत केली. एप्रिलच्या शेवटी पत्र आले आणि जूनच्या सुरुवातीला आम्ही याबाबत समिती गठीत केली. त्यामुळे प्रकल्प घालवला हे सांगणे चुकीचे आहे. मी नकार दिला आहे, असे ते म्हणत असतील तर त्यांनी एकतरी कागद दाखवावा, असे जाहीर आव्हान जयंत पाटील यांनी कराड यांना केले आहे.