मराठडवाड्यातील जायकवाडी येथे फ्लोटिंग सोलार प्रकल्प उभा राहावा म्हणून मी प्रयत्न केले. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पावर विचार करण्यात आला नाही. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रकल्पावर विचार करता येणार नाही, असे मला पत्राद्वारे सांगितले होते, असा दावा भाजपा नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी केला आहे. दरम्यान, जयंत पाटील यांनी कराड यांचे सर्व दावे फेटाळले आहेत. या प्रकल्पासाठी मी नकार दिला, असे कराड म्हणत असतील तर त्यांनी याबाबतचा एकतरी कागद दाखवावा, असे खुले आव्हान जयंत पाटील यांनी कराड यांना केले आहे.
मराठवाड्यातील कोणत्याही प्रकल्पाला मी नकार दिलेला नाही. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी खोटे बोलणे बंद करावे. औरंगाबादच्या जनतेला प्रभावित करण्यासाठी भागवत कराड यांचा हा उद्योग सुरू आहे, असे जयंत पाटील म्हणाले आहेत. “फ्लोटिंग सॉलार पॅनल प्रॉजेक्टबाबत भागवत कराड यांनी फक्त पत्र लिहिले होते. त्यामुळे सरकार फक्त पत्रावर चालत नाही. खरंतर केंद्राच्या एनटीपीसी विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव यायला हवा होता. मात्र भागवत कराड यांनी राज्य सरकारला पत्र दिले होते. केंद्रीय मंत्री असल्यामुळे आम्ही त्यांच्या पत्राची दखल घेतली व एक समिती गठीत केली. एप्रिलच्या शेवटी पत्र आले आणि जूनच्या सुरुवातीला आम्ही याबाबत समिती गठीत केली. त्यामुळे प्रकल्प घालवला हे सांगणे चुकीचे आहे. मी नकार दिला आहे, असे ते म्हणत असतील तर त्यांनी एकतरी कागद दाखवा,” असे जयंत पाटील म्हणाले.
“भागवत कराड यांना भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहण्यास सांगितलेले आहे. त्यांना राज्यसभेतून तिकीट दिले जाणार नाही. याच कारणामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. निवडणूक लढवायची असेल तर लढवावी, पण खोटं बोलू नये. माझ्या दृष्टीने त्यांना मी जास्त महत्त्व देत नाही. आम्ही नाचत नाही. आम्ही जे काही करायचं असते ते ‘करेक्ट’ करतो. त्यांना आता काही जमत नसेल म्हणून लोकांना प्रभावित करण्यासाठी ते अशी विधाने करत आहेत. आमच्याकडून नकारात्मक पत्र कधी गेले, त्यांना कुणी नाही म्हटलं याबाबत त्यांनी माहिती द्यावी. प्रकल्प कुणीच थांबवला नाही. त्यांनी फार मोठा तीर मारला असेही नाहीये. त्यांनी प्रकल्प आणलेला नाही. त्यांनी कल्पना रंगवलेली आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.