विश्वास पुरोहित
कमी वयात हलाखीच्या परिस्थितीत संघर्ष करुन यश मिळाले, पण या यशातून अहंकार निर्माण झाला, हळूहळू व्यसनाधीनता वाढत होती… २४ तास दारुच्या नशेत वावर… परिस्थिती इतकी बिकट झाली होती… पण जिद्दीच्या जोरावर दारुच्या विळख्यातून तो बाहेर पडला…हा प्रवास इथेच थांबला नाही…व्यसनातून बाहेर पडल्यावर त्याने फिटनेसवर लक्ष केंद्रीत केले आणि सात महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर मानाचा समजला आयर्न मॅन हा किताबही पटकावला. औरंगाबादच्या नितीन घोरपडे याने ही किमया साधली असून आयर्न मॅन हा किताब पटकावणारा मराठवाड्यातील तो पहिलाच तरुण ठरला आहे. नितीनचा व्यसनाधीन ते आयर्नमॅनचा हा प्रवास कसा होता हे जाणून घेऊया…
धुलीवंदनाचा तो दिवस आणि मद्याचा पहिल्या प्याला
नितीन घोरपडेचा औरंगाबादमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. आता व्यवसाय स्थिरावला असून दारुच्या विळख्यात कसा अडकत गेलो हे तो मनमोकळेपणाने सांगतो. ‘मी लहान असताना कुटुंबात वाद होते. नववीत असताना मी आईसोबत पुन्हा औरंगाबादला आलो. घरची परिस्थिती हलाखीची होती. आई धुणी भांडी करुन घर चालवायची. मी आणि माझा मोठा भाऊ मिळेल ते काम करुन हातभार लावायचो. आम्हाला दोन बहिणी देखील होत्या. पहाटे पेपर टाकून मी शाळेत जायचो. झोपडपट्टीत राहत असल्याने आजूबाजूला दारु सहज मिळायची. नववीत असतानाच पहिल्यांदा धुलीवंदनाच्या दिवशी मित्रांसोबत दारु प्यायलो, असे नितीन आठवून सांगतो.
दहावीनंतर रोज मद्यपान
नितीनची अभ्यासातील प्रगतीही समाधानकारक होती. मात्र, नोकरी करणे गरजेचे असल्याने नितीनने काम शोधायला सुरुवात केली. ओळखीतून नितीनला बजाज ऑटोसाठी काम करणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडे काम मिळाले. सुपरव्हायजरच्या हाताखाली नितीन कामाला लागला. महिन्याचा पगार ३०० रुपये होता. तसेच कामानिमित्त जे फिरणे व्हायचे त्यासाठी सुपरव्हायजर अतिरिक्त पैसे द्यायचा. हळूहळू नितीनला महिन्याला ५०० ते ६०० रुपये मिळू लागले. सुपरव्हायजर आणि त्याचे मित्र दारु पिण्यासाठी बसायचे त्यावेळी नितीनलाही थोडी दारु दिली जायची. पण याचे व्यसनात कधी रुपांतर होत गेले हे नितीनलाही समजले नाही. दोन – तीन वर्षांतच पगाराने हजाराचा आकडा ओलांडला. दुसरीकडे दररोज रात्री काम संपल्यावर दारु पिणे हा नितीनचा दिनक्रमाचा एक भागच झाला. कामात मेहनत घेत नितीन पुढे जात होता. या काळात भांडणामुळे सुपरव्हायजरची नोकरी गेली. कंपनीच्या मालकाने नितीनला त्याच्या जागेवर नेमले. इतक्या कमी वयात १० हजार रुपये पगार झालेला. विशीतल्या नितीनच्या मनात अहंकाराने जागा घेतली. ऐरवी रात्री दारु पिणारा नितीन दिवसादेखील दारु पिऊ लागला. मालकाला संध्याकाळी फोनवर हिशोब द्यावा लागायचा त्यावेळी नितीन फक्त शुद्धीत असायचा. पण हे फार काळ चाललं नाही. नितीन शेवटी कामावरुन काढून टाकण्यात आले.
दारुसोबत ब्राऊन शूगर, चरस गांजाचे व्यसन
३०० रुपयापासून सुरु झालेला पगार १० हजारावर पोहोचला. पण दारुपायी नितीन पुन्हा शून्यावर आला. नोकरी गेल्यावर काही दिवस नितीन पुन्हा दारुकडे वळला नाही. पण याच दरम्यान त्याला ओळखीतून पुन्हा नोकरी मिळाली. जयपूरच्या ट्रान्सपोर्ट कंपनीसाठी काम करु लागला. बजाज ऑटोच्या रिक्षा मुंबईत पाठवण्याचे काम होते. यातून नितीनला पुन्हा चांगली कमाई सुरु झाली. महिन्याला लाख रुपयांपर्यंत उत्पन्न पोहोचले. पण कमाई वाढताच व्यसनही बदलत गेले. महागड्या कार घेणे, मित्रांसोबत दारु पिणे, डान्सबारला जाणे, ब्राऊन शूगर, चरस, गांजा ते अगती स्नेक बाईटपर्यंत व्यसन त्याला जडले. नितीन २४ तास नशेत राहू लागला. यातच नितीनने गरीब घरातील मुलीशी लग्न केले. लग्नानंतर नितीन सुधारेल असे कुटुंबाला वाटायचे. पण नितीनची वाटचाल उलट्या दिशेने सुरु होती. मला पहिली मुलगी झाली त्यावेळी पत्नी रुग्णालयात होती आणि मी बारमध्ये बसून दारु पित होतो, असे तो सांगतो. तर दुसरा मुलगा झाला हे समजताच मी थेट मित्रांसोबत बार गाठल्याचे तो नमूद करतो. दारुचे व्यसन असले तरी दुसरीकडे नितीनची कामावरील पकड कायम होती. व्यवसाय वाढत होता, उत्पन्न दुप्पट झालेले. झोपडपट्टीतून नव्या घरात घोरपडे कुटुंबीय राहू लागले. २००६ मध्ये नितीनकडे स्वत:च्या मालकीचे ८ ते ९ ट्रक होते. २००६ – ०७ नंतर जागतिक मंदी आली आणि याचे परिणाम ट्रान्सपोर्ट व्यवसायावर झाले. कर्जाचे हप्ते थकल्याने नितीनला काही ट्रक विकावे लागले. आर्थिक संकटात नितीन दारु, गुटख्याच्या पूर्णपणे आहारी गेला. नशेत मारामारी करणे, बस स्टँडवरच झोपणे, दारु पिऊन गाडी चालवल्याने अपघात होणे हे सर्व प्रकार नितीनसाठी रोजचे झाले होते.
ते दोन दिवस
जानेवारी २०१० मध्ये नितीन कामानिमित्त औरंगाबादवरुन निघाला. मात्र, दोन दिवस त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. दोन दिवसांनी शिक्रापूरमध्ये मेहुण्याला नितीन सापडला. नितीन नशेत होता. तो तिथे कसा पोहोचला हे देखील त्याला आठवत नव्हते. शेवटी मेहुण्याने त्याला नाशिकमध्ये नेले. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर दारु सोडवण्यासाठी उपचार केले. आता दारु प्यायला तर मृत्यू होईल, अशी भीती देखील त्याच्या मनात घालण्यात आली. तिथून आल्यावर काही दिवस नितीन भीतीपोटी दारु प्यायला नाही. एकदा नितीन त्याच्या रोजच्या बारजवळून जात होता. बारच्या मॅनेजरला भेटण्यासाठी म्हणून मी आत गेलो. पण शेवटी तिथून पुन्हा दारु पिऊनच मी बाहेर पडलो, असे नितीनने सांगितले.
२२ दिवस रुग्णालयात
नितीन पुन्हा दारुच्या आहारी गेला. याचे परिणाम त्याच्या प्रकृतीवरही झाले. तब्बल २२ दिवस त्याला रुग्णालयात ठेवण्यात आले. या कालावधीत काय सुरु होते हे मला आठवत नाही. मी रुग्णालयात होतो. मी वेड्यासारखा वागायचो, असे कुटुंबीय सांगतात. उपचारानंतर घरी परतल्यावर दोन मित्रांनी व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या एका संस्थेत नेले. याचे सकारात्मक परिणाम माझ्यावरही झाले, मी हळूहळू सर्वांमध्ये मिसळू लागलो, असे नितीन आवर्जून सांगतो. एप्रिल २०१० मध्ये नितीनने अखेर दारु सोडली. मी बरा होईपर्यंत माझा व्यवसाय भावाने सांभळला. मी बरा होऊन आलो त्यावेळी मला समजले की व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम व्यवसायावरही झाले होते. माझ्या डोक्यावर तब्बल एक कोटींचे कर्ज झाले होते, असे नितीन सांगतो.
दारुऐवजी आता फिटनेसचे वेड
२००९ मध्ये नितीनचे वजन ४२ किलो होते. २०१० मध्ये दारु सोडल्यानंतर नितीनने आधी व्यवसायात लक्ष घातले. थकवलेले कर्ज परत केले. व्यसनामुळे कुटुंबावरही परिणाम झालेले होते. अखेर २०१४ मध्ये नितीनचे आयुष्य पूर्ववत झाले होते. नितीन व्यसनमुक्तीसाठी काम करु लागला. नितीनचे जेवणही वाढले. २०१५ पर्यंत त्याचे वजन ८२ किलो झाले. पण चालतानाही दम लागू लागला. आता फिटनेसवर लक्ष केंद्रीत करायचे असा निर्धार त्याने केला आणि इथून सुरु झाला आयर्नमॅनचा प्रवास.
मॅरेथॉन ते ट्रायथलॉन
२०१५ मध्ये नितीन एका मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला. यात तो पहिल्या पाचमध्ये आला. नितीनचा आत्मविश्वास वाढला होता. मग ऑगस्ट २०१५ मध्ये हैदराबाद हाफ मॅरेथॉन (२१ किमी) आणि २०१६ मध्ये मुंबईत फूल मॅरेथॉनमध्ये (४२ किमी) त्याने सहभाग घेतला. व्यायाम वाढल्याने वजनही घटले होते. रनिंगनंतर नितीन सायकलिंगही करु लागला. सायकलिंग आणि रनिंगच्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत त्याने छाप पाडली. मग नितीनने २०१७ मध्ये थेट ट्रायथलॉन पूर्ण करण्याचे ठरवले.
सात महिन्याचे खडतर प्रशिक्षण
ट्रायथलॉनमध्ये जलतरण, धावणे आणि सायकलिंग असे तिन्ही प्रकार करावे लागतात. निर्धारित वेळेत ते पूर्ण करणाऱ्याला आयर्नमॅनचा किताब मिळतो. नितीनने प्रशिक्षक अभिजित नारगोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरावाला सुरुवात केली. पहाटे चार ते रात्री नऊ असा दिनक्रम आखण्यात आला. यात जिम, सायकलिंग, धावणे आणि पोहणे अशा सर्व गोष्टी नितीन करायचा. ट्रायथलॉन परदेशात होणार असल्याने तिथे थंड पाण्यात पोहावे लागू शकते, याचा नितीनला अंदाज होता. यासाठी नितीनने भन्नाट शक्कल लढवली. घरातल्या बादलीत बर्फ टाकून नितीन आंघोळ करायचा. तर पोहण्याचा सराव जलतरण तलावात आणि काही वेळेला नदीतही केला. या कालावधीत नितीनने डाएटही ठरवले होते. फक्त उकडलेले पदार्थ तो खायचा. तेलकट, तिखट, गोड पदार्थ खाणे त्याने बंद केले होते. पहाटे, दुपारी आणि रात्री अशा तिन्ही वेळेला त्याने धावणे आणि सायकलिंगचा सराव केला. ट्रायथलॉनमध्ये याचा फायदा होणार होता.
जर्मनीतील आव्हान
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जर्मनीतील हॅम्बर्ग येथे ट्रायथलॉन शर्यत पार पडली. जर्मनीतील वातावरण थंड असेल असे त्याला वाटत होते. पण तिथे उन्हाळा होता. तापमान ३० डिग्रीपेक्षा जास्त होते. तर सायकलही भाड्याने घेतलेली. सरावात वापरलेली सायकल आणि प्रत्यक्षात स्पर्धेतील सायकल यातही तफावत होती. याशिवाय तिथे अंधार उशिरा पडतो. त्यामुळे झोपेचाही त्रास होता. पण नितीनने इच्छाशक्तीच्या जोरावर हे सर्व अडथळे पार केले. नितीनला या स्पर्धेत १५ तास ५० मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. यात नदीतील ३.८ किलोमीटरचे अंतर २ तास २० मिनिटात पोहून गाठायचे होते. यानंतर सायकलिंगचे १८० किलोमीटरचे अंतर ७ तास १० मिनिटे आणि रनिंगमधील ४२ किलोमीटरचे अंतर ६ तास १० मिनिटांमध्ये पूर्ण करायचे होते. एकूण निर्धारित वेळ १५ तास ५० मिनिटे होता. मात्र, आयत्या वेळी आयोजकांनी तांत्रिक अडचणीमुळे जलतरणाचा टास्क रद्द केला. त्याऐवजी रनिंगमध्ये ६ किलोमीटरचे अंतर वाढवण्यात आले आणि निर्धारित वेळ १४ तास ५० मिनिटे इतका देण्यात आला. नितीनने हे १२ तास ५० मिनिटे ३७ सेकंदांमध्ये पूर्ण करत आयर्नमॅनचा किताब पटकावला.
vishwas.purohit@loksatta.com