Police Notice to Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना औरंगाबाद पोलिसांनी नोटीस पाठवून आरोपपत्र दाखल करताना न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. १ मे रोजीच्या औरंगाबाद सभेत राज ठाकरेंनी पोलिसांच्या अटींचा भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल आहे. आता या प्रकरणी आरोपपत्र दाखल होणार आहे. हे आरोपपत्र दाखल होत असताना राज ठाकरेंनी उपस्थित रहावं, असं या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे.
औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंना स्पीड पोस्टने ही नोटीस पाठवली आहे.
डीसीपी उज्वला वनकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं, “राज ठाकरे यांची औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा झाली होती. त्या अनुषंगाने एक गुन्हा दाखल आहे आणि त्याचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांना ४१(१) ची नोटीस बजावण्यात आली आहे.”
हेही वाचा : VIDEO: “राज ठाकरे RSS च्या वाटेवर” सचिन खरात यांचं टीकास्र, नेमकं काय म्हणाले?
“आम्ही याबाबत राज ठाकरेंना माहिती दिली आहे. आता कोर्टात आरोपपत्र दाखल होईल तेव्हा त्यांना तेथे हजर रहावं लागेल. ज्या गुन्ह्यांमध्ये सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा होते आणि आरोपीला अटक करणे आवश्यक नाही अशा प्रकरणात पोलीस ४१(१) नुसार नोटीस बजावतात,” अशी माहिती वनकर यांनी दिली.