औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील स्थलांतरित मजूर, कामगारांना स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका असं भावनिक आवाहन केलं आहे. औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांच्या मृत्यूबद्धल उद्धव ठाकरे यांनी तीव्र दू:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही दिले आहेत.

जालना येथे काम करणारे मजूर भुसावळकडे चालत प्रवास करत असताना थकून रुळावर झोपल्याने त्यांच्या अंगावरून मालगाडी गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादजवळील करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात पहाटे सव्वा पाचच्या सुमारास घडला. दोन जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आणखी वाचा- औरंगाबाद रेल्वे दुर्घटना: मृत मजुरांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाखांची मदत, उद्धव ठाकरेंची घोषणा

“गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागातून विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहे. त्यातून सुमारे एक लाख लोक आपापल्या गावी सुखरूप पोहचले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत राज्यात अडकलेले सर्व श्रमिक व्यवस्थित त्यांच्या घरी पोहचतील असे नियोजन झाले असून रेल्वेशी सातत्याने समन्वय सुरु आहे. नुकतीच मुंबईहून रेल्वे सोडण्याचा निर्णयही झाला असून त्यामुळेही अनेक मजूर घरी परततील. मात्र जीवावर उदार होऊन, स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका,” असं आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

आणखी वाचा- धक्कादायक! औरंगाबादमध्ये १६ मजूरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू

“परराज्यातील सर्व मजुरांची निवारा व्यवस्था त्या त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्याठिकाणी अगदी  शेवटचा मजूर घरी जात नाही आम्ही त्यांची जेवणाची आणि वैद्यकीय उपचाराची सोय करतो आहोत, त्यामुळे आपली निवारा केंद्रे सोडून लगेच बाहेर पडू नका. रेल्वेच्या वेळापत्रकाविषयी आपल्याला रेल्वे व सरकारमार्फत व्यवस्थित माहिती दिली जाईल,” असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

Story img Loader