शामियानाखाली दहावीची परीक्षा घेणे, कॉपीसारख्या प्रकाराला पाठबळ देण्यासह इतरही सुविधांची पूर्तता केली नसल्याचा ठपका ठेवत औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील निलजगाव येथील लक्ष्मीबाई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाची मान्यता रद्द केल्याची केल्याची माहिती शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी आज (बुधवार) बैठकीत दिली. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांमध्ये कॉपीसारखे प्रकार खपवून घेतले जाणार नसून, अशा शाळांची मान्यता रद्द करण्यात येईल, असे विधानसभेत स्पष्ट केल्यानंतर निलजगाव शाळेबाबत निर्णय घेण्यात आल्याचे साबळे यांनी सांगितले.
मुलांना शामियानाखाली परीक्षेला बसवल्याने साधन-सुविधांबाबत चुकीची माहिती दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणी तुमच्या शाळेची मान्यता का रद्द करण्यात येवू नये? अशी नोटीस शाळेला शिक्षण विभागाने बजावली होती. दहावीच्या परीक्षेच्या दिवशी ज्या विषयाचा पेपर आहे, त्या विषयाचे शिक्षक शाळेच्या परिसरात असता कामा नये, असा मंडळाचा नियम असतांनाही मराठी विषयाचे शिक्षक हे शाळेत होते. बालभारतीची गाईड पळत घेवून जातानाचे त्यांचे फोटो आणि व्हिडिओही समोर आला आहे. यामुळे तातडीने बुधवारी आपण स्वतः शिक्षणाधिकारी (मा.) एम. के. देशमुख, विभागीय सचिव आर. पी. पाटील यांनी प्रत्यक्ष केंद्रावर जावून चौकशी केली, पाहणी केली असता त्यांची उत्तरे समाधानकारक नव्हती. बाहेरच्या मुलांनी आणलेले गाईड नष्ट केल्याचे उत्तर त्यांनी दिले. हा संपूर्ण अहवाल शिक्षणमंत्री यांना पाठविण्यात आला असता त्यांनी कॉपीचा कुठलाही प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे ठणकावत ज्या शाळा कॉपीला प्रोत्साहन देतील, त्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येईल असे आदेश दिले. त्यामुळे निलजगावच्या या शाळेची मान्यता कायमस्वरुपी रद्द करण्यात येत आहे. तसेच शाळेला त्यांची बाजू मांडण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे, असेही साबळे यांनी सांगितले.
त्या विद्यार्थ्यांची सोय दुसऱ्या केंद्रावर निलजगावची शाळा आठवी ते बारावीपर्यंत आहे. त्यांच्याकडे दहावीचे ५२ विद्यार्थी आहेत. बारावीचे केंद्र यापूर्वीच बदलण्यात आले आहे. तर दहावीचे आताचे केंद्र बोकुड जळगाव येथील सुरेखा शंकरसिंग नाईक शाळा हे करण्यात आले आहे. या शाळेत एक मुख्याध्यापक, चार उपशिक्षक आणि एक लिपीक, दोन शिपाई आहेत. परीक्षा संपल्यावर पालकांना हवे असल्यास ते मुलांची शाळा बदलू शकतात. अन्यथा त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, यासाठी विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत समायोजित करण्यात येईल. ही शाळा ४० टक्के अनुदानित होती. असे असतांनाही शाळेने चुकीची माहिती मंडळास दिल्याचेही साबळे यांनी सांगितले.