औरंगाबाद शहराजवळील गांधेली परिसरात एका कारमध्ये एका महिलेचा व पुरुषाचा मृतदेह बुधवारी दुपारनंतर जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून या प्रकरणातील पुरूषाची ओळख पटली आहे. तर महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक गात यांनी दिली.
निर्जनस्थळी कार उभी होती. गुराख्याना स्फोटासारखा आवाज ऐकू आला. काहीतरी विपरीत घडले असावे या संशयातून गुरख्यांनी ही माहिती चिकलठाणा पोलिसांना दिली. पोलिसांचे एक पथक गांधेली शिवारात पोहोचले परिसराची पाहणी करताना निर्जनस्थळी पांढऱ्या रंगांची चारचाकी उभी पोलिसांना दिसली.
कारचा बाह्य भाग नवा कोरा दिसत असला तरी आतील भाग पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होता. शिवाय एक लायटरही पोलिसांना आढळून आले. मृत पुरूष व महिला हे प्रेमी युगुल असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेहांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करून त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.