दुग्ध व्यवसाय हा शेतीचा जोडधंदा म्हणून त्याकडे पाहिलं जातं. पश्चिम महाराष्ट्रात शिवारात पाणी खेळत असल्यानं त्याला व्यापक स्वरूप मिळालं. जोडधंद्याचा व्यवसाय झाला. अनेक घरात शेकडो लिटर दुध निघू लागलं. त्यामुळे गावाचं अर्थकारण बदललं. मराठवाड्याच्या वाट्याला दोन वेळेस राज्याचं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रिपद आलं. मात्र पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेनं मराठवाड्यात म्हणावी तशी धवलक्रांती झाली नाही. राजकीय उदासीनता आणि दुष्काळाच्या दृष्टचक्रात मराठवाडा अडकल्याने दुधाचा व्यवसाय झाला नाही. त्यामुळे त्याच्याकडे जोडधंदा म्हणूनचं पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टीकोन आहे. अर्थात त्याला काही लोक अपवाद आहेत. दुष्काळी मराठवाड्यातही काही जणांनी दुधाच्या जोडधंद्याला व्यवसायाचं स्वरूप दिलं. त्यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. औरंगाबादपासून २५ ते ३० किलोमीटर अंतरावरील लाडगाव येथील विमल ईथ्थर त्यापैकीच एक आहेत.

मुलांच्या आहारात दूधाचा सामावेश व्हावा म्हणून विमलताईंनी २००२ साली एक म्हैस घेतली होती. पुढे यातूनच त्यांनी दुग्धव्यवसायाला सुरूवात केली. गेल्या १६ वर्षांत त्यांच्या व्यवसायात मोठी वाढ झालीय. आता त्यांच्याकडे मुर्रा जातीच्या ३० आणि जाफराबादी ९५ अशा १२५ म्हशी आहेत. दररोज हजार ते बाराशे लिटर दूध निघतं . त्यातून महिन्याची आर्थिक उलाढाल २७ लाख  रुपये एवढी होते. खर्च वजा करता महिन्याला दहा ते पंधरा लाख एवढा फायदा होत असल्याचं त्यांचा मुलगा गजानन यांनी सांगितलं. गजानन राखीव पोलीस दलात भरती झाला होता. काही वर्ष त्यानं सरकारी नोकरी केली. मात्र नोकरीपेक्षा दुधाचा व्यवसाय जास्त फायदेशीर असल्यानं नोकरी सोडून याच व्यवसायाकडे त्यानं लक्ष केंद्रीत केलं. विमल यांची आणखी दोन मुलंही या व्यवसायात त्यांना मदत करतात.

विमल ईथ्थर यांचं माहेर औरंगाबाद तालुक्यातील  दुधड येथे आहे . १९८१ साली त्यांचं लग्न झालं. नेटानं संसार करणाऱ्या विमलताईंनी बचतगट सुरू केला. त्याच पैशांतून त्यांनी २००२ साली म्हैस घेतली. त्यावेळी तिची किंमत होती साधारण दहा हजार रुपये. म्हैस सात ते आठ लीटर दुध द्यायची. कुटुंबासाठी काही लीटर दूध बाजूला काढून उरलेलं दूध विक्रीसाठी दिलं. दूधातून मिळणारं उत्पादन वाढल्यानंतर त्यांच्या पतीनं नोकरी सोडून याच व्यवसायात लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं. आज विमल यांच्या हाताखाली १५ कामगार काम करत आहेत. त्यांना दररोज एक लिटर दूध आणि महिन्याला दहा हजार रुपये वेतन दिलं जातं.

म्हशीसाठी त्या हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश येथून चारा मागवतात. चाऱ्यासाठी त्यांनी तीन ट्रक खरेदी केले आहेत .शिवाय ज्वारी, मका, पेंड यांच्या मिश्रणाचा खुराक म्हशींना दिला जातो. त्यासाठी महिन्याला तीन ते चार लाखाचा खर्च होतो. दुधासोबत म्हशीच्या शेणातूनही पैसे मिळतात. वर्षाकाठी सात ते आठ लाखाचं शेण विकलं जातं असंही त्या म्हणाल्या. दुष्काळी मराठवाड्यात एका अशिक्षित शेतकरी महिलेनं कुटुंबाचं सक्षमीकरण केलं. दूध व्यवसायातून त्यांचं अर्थकारण बदललं म्हणूच त्यांच्या या शाश्वत प्रयोगाचा अनेक ठिकाणी सन्मान होत आहे.

Story img Loader