Imtiyaz Jaleel On Aurangzeb Controversy: गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाचा आणि त्याच्या कबरीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यानंतर अबू आझमींसह काही राजकीय नेत्यांनी या संपूर्ण प्रकरणावार विविध विधानं केल्यामुळे हा मुद्दा आणखी तापला. पुढे औरंगजेबची कबर हटवण्याच्या मुद्द्यांवरून नागपूरमध्ये हिंसाचारही झाल्याचे पाहायला मिळाले. आता यावर छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मोठं भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आबू आझमी यांनी भाजपाच्या सांगण्यावरून औरंगजेब याच्याबाबतचे वक्तव्य केलं.
माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, “शिकलेल्या लोकांनाही असे वाटते की, औरंगजेबाने ४०० वर्षांपूर्वी काही केलं त्याचा हिशेब इम्तियाज जलील यांच्याकडे मागू. तुम्ही आबू आझमींचे नाव घेतले. मला वाटते हे सर्व मॅनेज होतं. विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून अबू आझमींनी उमेदवार उभे केले होते. कारण त्यांची उत्तर प्रदेशात संपत्ती आहे, खूप सारे कनेक्शन्स आहेत. माझ्या विरोधातही त्यांनी उमेदवार उभा केला होता. त्याला ५ हजार मतं मिळाली आणि माझा २ हजार मतांनी पराभव झाला.”
औरंगजेब महान होता म्हणायची काय गरज होती?
एबीपी माझाच्या, माझा व्हिजन या कार्यक्रमात बोलताना, जलील पुढे म्हणाले की, “अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता. अनेक महत्त्वाचे प्रश्न होते. त्यांच्या मतदारसंघातीलही अनेक प्रश्न होते. तिथे गोवंडीत इतका मोठा ड्रग्सचा व्यवसाय चालतो. अबू आझमी यांचे लोकच हे चालवतात. ते संपवण्यासाठी विधानसभेत चर्चा न करता. हे येतात आणि म्हणतात औरंगजेब महान होता. काय गरज होती याची? हे करण्यासाठी भाजपाने त्यांना भाग पाडले. तुम्ही पहिल्या दिवशी या, आम्हाला लोक खूप प्रश्न विचारणार आहेत. संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली? क्राइम रेट किती आहे?” आम्हाला उत्तरे देता येणार नाहीत. तुम्ही आम्हाला मदत करा.”
काय म्हणाले होते अबू आझमी?
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पत्रकारांशी बोलतना आमदार अबू आझमी म्हणाले होते की, “आपल्याला चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबने अनेक मंदिरे बांधली होती. त्यामुळे, आपण औरंगजेबला क्रूर शासक मानत नाही. तसेच, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील युद्ध ही राज्य कारभाराशी संबंधित होती. त्याला कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी किनार नव्हती, असं वक्तव्य आझमी यांनी केलं होतं.”