सांगली : औरंगजेब जरी मेला असेल तरी ईडीच्या रुपाने तो आजही जिवंत आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या एकामागून एक नेत्याला येत असलेल्या ईडीच्या नोटीसीबद्दल आणि होत असलेल्या चौकशीबद्दल खदखद व्यक्त करत थेट ईडीवर टीका केली.
वाळवा तालुक्यातील बागणी येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या माध्यमातून ग्राम पंचायत इमारतीवर उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या तैलचित्राच्या अनावरण सोहळ्यात आ. मिटकरी बोलत होते. यावेळी आ. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा – भाजपच्या वर्तणुकीमुळे शिंदे गटातील अस्वस्थतेला धुमारे
औरंगजेबाची कितीही आक्रमणे आली तरी कधीही छ. संभाजी महाराज डगमगले नाहीत. पोर्तुगिजांची, डचांची, इंग्रजांची, मोघलांची आक्रमणे झाली, पण संभाजी महाराज कधीच डगमगले नाहीत. हेच रक्त आज तुमच्या-आमच्यामध्ये आहे. औरंगजेब जरी मेला असेल तरी ईडीच्या रुपाने तो आजही जिवंत आहे. त्यामुळे ईडीची कितीही आक्रमणे झाली तरी त्याला किंचितही शरण न जाणारा योद्धा म्हणून खा. शरद पवार आणि आ. पाटील यांच्याकडे आम्ही पाहतो. जे शरण गेलेत ते आता काही दिवसांनी शपथ घेतील. पण जे शरण गेले नाहीत त्यांना काही दिवस त्रास होत राहतो, मिटकरी म्हणाले.