Aurangzeb Tomb क्रूर शासक अशी ओळख असलेला औरंगजेब महाराष्ट्रात १७०७ या वर्षी त्याचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजी नगरमधील खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे. ही कबर ASI म्हणजेच भारतीय पुरातत्व खात्याने झाकून ठेवली आहे.
औरंगजेबाची कबर पुरातत्व खात्याने झाकली
औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होते आहे. तसंच १७ मार्च रोजी औरंगजेबाची कबर उखडण्याच्या मुद्द्यावरुन दंगलही उसळली होती. त्यानंतर आता औरंगजेबाची कबर झाकून ठेवण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर येथील खुलताबाद या ठिकाणी ही कबर आहे.
खुलताबादमध्ये ड्रोन उडवण्यास बंदी
काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी खुलताबाद वरुन ड्रोन उडवण्यास १८ एप्रिल पर्यंत मनाई केली आहे. तसंच खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर आणि परिसर हा रेड झोन म्हणून काही काळासाठी जाहीर करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांचं असं म्हणणं आहे की औरंगजेबाच्या कबरीची तोडफोडो आणि नासधूस होण्याची शक्यता आहे. तसंच त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यानंतर ड्रोनसाठी या भागात मनाई करण्यात आली आहे.
औरंगजेबाची कबर कुठे आहे?
औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातल्या खुलताबाद या ठिकाणी आहे. ही कबर अत्यंत साधेपणाने बांधली आहे. या कबरीवर अनेकदा फक्त पांढऱ्या रंगाची चादर असते. तसंच या कबरीवर सब्जाचं झाड आहे. औरंगजेबाची ही कबर कुणी बांधली? तर त्याचंही उत्तर जाणून घ्या.
औरंगजेब महाराष्ट्रात का आला होता?
छत्रपती शिवरायांचा मृत्यू १६८० मध्ये झाला. त्यानंतर चार लाखांचा फौजफाटा घेऊन औरंगजेब दख्खन जिंकण्यासाठी महाराष्ट्रात १६८१ मध्ये आला. औरंगजेबाला छत्रपती संभाजी राजांनी कडवी झुंज दिली. मात्र १६८९ मध्ये झालेल्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यात आलं. त्यानंतर औरंगजेबाने त्यांना हाल करुन ठार केलं. मात्र औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांना ठार केल्यानंतरही महाराष्ट्र जिंकता आला नाही. News 18 ने याबाबतंच वृत्त दिलं आहे.
औरंगजेबाची कबर खुलताबाद या ठिकाणी कुणी बांधली?
आत्ताचे अहिल्यानगर हे पूर्वी अहमद नगर म्हणून ओळखलं जात होतं. १७०७ मध्ये भिंगार येथील किल्ल्यात औरंगजेबाचा मृत्यू झाला. आपला मृत्यू झाल्यास खुलताबाद या ठिकाणी दफन करण्यात यावं अशी औरंगजेबाची इच्छा होती. जी औरंगजेबाचा मुलगा आजमशाह याने पूर्ण केली. आजमशाह यानेच औरंगजेबाची कबर खुलताबाद या ठिकाणी बांधली. इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी ही माहिती दिली आहे. झैनुद्दीन सिराजी यांना औरंगजेब गुरु मानत असे. त्यांच्या कबरीशेजारीच औरंगजेबाची कबर त्याच्या इच्छेनुसार बांधण्यात आली आहे.