Aurangzeb Tomb : महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर उखडून टाकली पाहिजे अशी मागणी भाजपा खासदार उदयनराजेंनी केली. त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगजेब हा विषय गाजतो आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. १७ मार्चला राज्याच्या उपराजधानीत म्हणजेच नागपूरमध्ये यावरुन दोन गटात हिंसाचारही उसळला. ही कबर हटवावी का? याबाबत विचारवंत आणि लेखक तसंच संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे.
काय म्हणाले सदानंद मोरे?
“औरंगजेब हा विषय महाराष्ट्रात येण्यामागे छावा हा सिनेमा आहे. जे काही अत्याचार औरंगजेब याने केल्याचं दाखवलं आहे त्यामुळे लोकांच्या मनात क्षोभ निर्माण झाला. शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर हा सिनेमा आहे. छावा ही कादंबरी आली तेव्हा तिला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळचे एक अधिकारी शिवाजीराव पाटील असं म्हणाले होते की ही कादंबरी वाचून महाराष्ट्रातील आया-बाया रडतील. पण तसं काही घडलं नाही. आता सिनेमा आल्यावर हे घडतं आहे. याचं कारण काय? याचा मी विचार केला तेव्हा लक्षात आलं की छावा वाचणं आणि छावा पाहणं यातला हा फरक आहे. वाचताना प्रत्येकाची कल्पनाशक्ती दृश्य समोर येईल अशी असतेच असं नाही. आता एखादा निर्माता, दिग्दर्शक येऊन अशा सिनेमा तयार करतात तेव्हा तो क्षोभ निर्माण झाला.” असं सदानंद मोरे यांनी म्हटलं आहे. थिंक बँकला दिलेल्या मुलाखतीत सदानंद मोरे यांनी हे मत मांडलं आहे.
औरंगजेबाबाबत काय म्हणाले सदानंद मोरे?
“मी औरंगजेबाच्या बाबतीत विचार करतो तेव्हा खटकन एक बाब माझ्यासमोर येऊन गेली. कालचक्र कसं असतं बघा.. इतिहासाची विडंबना वगैरे आपण ज्याला म्हणतो ते आहे. औरंगजेब हा चार भावांपैकी एक. त्याला राज्यतृष्णा होती. तीन प्रतिस्पर्धी भावांचा काटा त्याने शिताफीने काढला. इंग्लंडमध्ये औरंगजेब हयातीत असताना औरंगजेबाने सत्ता कशी मिळवली त्यावर एक नाटक लिहिण्यात आलं. ते इंग्रजी भाषेत होतं. त्याच्या शिताफीची जागतिक पातळीवर त्याची दखल घेतली गेली. औरंगजेबाचा ताकदीचा प्रतिस्पर्धी होता दारा शिकोह, मुराद, सुरजा वगैरे महत्त्वाचे नाहीत. दाराला शाहजानचा पाठिंबा होता. त्यानंतर दाराशी युद्ध झालं. दारा त्यात हरला. दाराला पकडण्यात आलं. दाराची दिल्लीत मरतुकड्या उंटावरुन धिंड काढण्यात आली होती. अशीच धिंड संभाजी महाराजांचीही काढण्यात आली होती. दिल्लीतून धिंड काढण्यात आल्यानंतर दाराचा शीरच्छेद करण्यात आला. त्यानंतर ते शीर औरंगजेबाकडे आलं. औरंगजेबाने ते दाराचं शीर आहे ना? याची खात्री केली. त्यानंतर ते शीर एका पेटीत ठेवलं आणि शाहजानला भेट म्हणून पाठवलं. त्यावेळी शाहजानला वाटलं औरंगजेबाचं मन बदललं. पण त्याला दाराचं शीर दिसलं त्यावेळी त्याला त्याचं क्रौर्य कळलं. औरंगजेबाचं समर्थन कुणीही माणूस कुठल्या धर्माचाच नाही जो माणूस आहे तो करुच शकत नाही.”
दाराच्या मृतदेहाचा दफनविधीही औरंगजेबाने नीट होऊ दिला नाही-सदानंद मोरे
दारा शिकोहला मारल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करायचे. त्यामुळे कबर बांधणं भाग होतं. दिल्लीत हुमायूँनची कबर आहे. राजपुरुष असल्याने दाराच्या मृतदेहाचा अंत्यविधी नीट होऊ दिला नाही. दाराचा मृतदेह गाडण्यात आला. तो कुठे गाडला हे निश्चित कुणालाच सांगता येत नाही. दारा शिकोह भारताच्या धर्म निरपेक्षतेचं प्रतीक आहे. ५५ उपनिषदांचं भाषांतर त्याने पर्शियन भाषेत केलं होतं. दारा शिकोहने या सगळ्यासाठी बलिदान दिलं आहे. कारण दारा काफिर आहे असं सांगूनच औरंगजेबाने काटा काढला होता. दाराच्या प्रेताची, कबरीची औरंगजेबाने विटंबना केली. आता कालचक्र ज्याला म्हणतो ती तशी पाळी औरंगजेबावर येते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असं सदानंद मोरे म्हणाले.
औरंगजेबाच्या कबरीबाबत काय म्हणाले सदानंद मोरे?
“औरंगजेबाची कबर पाडावी, उद्ध्वस्त करावी या मताचा मी मुळीच नाही. मला ते मान्य नाही. का मान्य नाही? जो क्षोभ उसळला आहे तो मी समजू शकतो. कारण ते मनुष्य स्वभावाला धरुन आहे. इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी हे सांगतो की एवढा महत्त्वाकांक्षी औरंगजेब जो दक्षिणेत आला, जे मार्गात होते त्यांना संपवायचं होतं. कुतूबशाही होती, आदिलशाही होती. त्यांचा निकाल औरंगजेबाने लावला. पण मराठे राहिले. स्वराज्य अवघ्या ६ वर्षांचं आहे. कारण १६७४ मध्ये महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज वारले. औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आला नाही. औरंगजेबाची कबर हे महाराष्ट्राच्या पराक्रमाचं प्रतीक आहे. ती पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील माणसाची छाती फुलून आली पाहिजे. कारण तो आपल्या इतिहासाचा भाग आहे. एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे औरंगजेब कुणाचा हिरो होऊ नये. ती खबरदारी घेतली पाहिजे, तो होता, लढला आणि इथेच संपला हे लोकांना कळलं पाहिजे. कबर नष्ट करुन तुम्ही तुमचा इतिहास संपवू नका.” असं सदानंद मोरे यांनी म्हटलं आहे.