गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात औरंगजेब हा विषय चांगलाच चर्चेत आहे. कारण १४ फेब्रुवारीला छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला. छत्रपती संभाजी महाराज मराठ्यांच्या फितुरीमुळे कसे पकडले गेले आणि मग औरंगजेबाने त्यांना कसं हाल करुन मारलं हे दाखवण्यात आलं आहे. यानंतर औरंगजेबाची कबर उखडण्याची मागणीही होते आहे. दरम्यान हुसेन दलवाई यांनी एक आरोप करुन नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

औरंगजेबाची समाधी उखडण्याची मागणी का होते आहे?

औरंगजेबाची समाधी खुलताबाद या ठिकाणाहून उखडून टाका अशी मागणी भाजपाचे खासदार उदयनराजे यांनी केली. त्यानंतर ही मागणी जोर धरु लागली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनीही औरंगजेबाची कबर उखडून टाका अशी मागणी केली आहे. ज्यानंतर या औरंगजेबाच्या कबरीला भारतीय पुरातत्व खात्याने संरक्षण दिलं आहे. दरम्यान आता छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने मनुस्मृतीप्रमाणे ठार केलं, ज्या काही शिक्षा त्याने संभाजी महाराजांना दिल्या त्या पंडितांनी मनुस्मृतीप्रमाणे होत्या असा आरोप काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार यात शंका नाही.

हुसेन दलवाई काय म्हणाले?

“औरंगजेबाने शंभू महाराजांना ज्या पद्धतीने मारलं ती क्रूरता होती. औरंगजेबाने दारा शिकोहला जसं मारलं तसंच छत्रपती संभाजी महाराजांना मारलं. औरंगजेबाने संभाजी महाराजांना कसं मारावं ते पंडितांनी मनुस्मृतीप्रमाणे सांगितलं आणि त्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजेंना मारण्यात आलं. देवेंद्र फडणवीस हे मान्य करतील का? वस्तुस्थिती अमान्य करुन चालणार नाही”

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कसं मारलं?

छत्रपती संभाजी महाराज हे संगमेश्वर या ठिकाणी फितुरीमुळे पकडले गेले. त्यानंतर इतिहासकारांनी सांगितल्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांना आणि कवी कलश यांना दोघांना बेड्या घालण्यात आल्या. या बेड्या हातात आणि पायांमध्ये होत्या. त्यानंतर उंटावर बसवून आणि विदूषकाचे कपडे घालून छत्रपती संभाजी महाराजांची धिंड काढण्यात आली. औरंगजेबाने त्यानंतर ४० दिवस अत्यंत क्रूर पद्धतीने हाल करुन छत्रपती संभाजी महाराजांना ठार केलं. सुरुवातीला त्यांची नखं काढण्यात आली. त्यानंतर त्यांना खिळे असलेल्या चाबकाने मारण्यात आलं आणि त्यांची कातडी सोलण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जखमांवर मीठ चोळण्यात येत असे. त्यांचे डोळे काढले, जीभ काढली ४० दिवस अनन्वित छळ केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा शीरच्छेद करण्यात आला. त्यानंतर त्यांचं शीर भाल्याला अडकवून फिरवण्यात आलं आणि त्यांच्या मृतदेहाचीही विटंबना करण्यात आली. आता काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी या सगळ्या शिक्षा मनुस्मृतीप्रमाणे होत्या आणि पंडितांनी औरंगजेबाला सांगितल्या होत्या असं म्हटलं आहे. या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.