Abu Azmi : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत एक विधान केलं आहे. त्यामुळे नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस होता. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान विधिमंडळाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे.

अबू आझमी नेमकं काय म्हणाले?

“चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती”, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

“मी असं मानतो की औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तानपर्यंत होती. त्या काळात आपला जीडीपी २४ टक्के एवढा होता. तेव्हा भारताला सोने की चिड़िया म्हटलं जायचं. मग मी याला चुकीचं म्हणू का? तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाची लढाई ही धर्माची होती असं मी मानत नाही”, असं अबू आझमी यांनी म्हटलं. ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

उपमुख्यमंत्री शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली?

“औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं हे अतिशय दुर्देवी आहे. अबू आझमी यांच्या विधानाचा निषेध करावा तेवढा कमी आहे. अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. औरंगजेबाचं कौतुक करणं हे महापाप आहे”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली?

“अबू आझमी अशा प्रकारे जे विधान करत आहेत ते कोणाची सुपारी घेऊन करत आहेत? कोणते वाद निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे मी याआधीही सांगितलं होतं. कोणाचा इशारा आणि कोण बोलायला लागतं हे मी आधीही सांगितलं होतं. महाराष्ट्रात असं विधान कोणी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.

राम कदम काय म्हणाले?

“खरं तर अबू आझमी यांना इतिहासाचं पुस्तक देण्याची गरज आहे. ते जेव्हा सभागृहात येतील तेव्हा मी त्यांना इतिहासाचं पुस्तक भेट देणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कशा पद्धतीने कैदेत ठेवलं होतं, कसा छळ केला हे अबू आझमी यांना माहित नाही का?”, अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली.

Story img Loader