आटलेली धरणे, कोरडय़ाठाक विहिरी, भेगा पडलेल्या शेतजमिनी आणि भीषण पाणीटंचाई.. अशा चार दशकांतील सर्वात मोठय़ा दुष्काळाला सामोरे जात असलेल्या महाराष्ट्राला ‘पाणीदार’ दिलासा देणारी बातमी हवामान विभागाने शुक्रवारी दिली. यंदा देशात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडेल, असा मान्सूनपूर्व अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. पावसाचे आगमन कधी होईल, याचा अंदाज मात्र मे महिन्याच्या मध्यापर्यंत जाहीर करण्यात येणार आहे.
केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्रालयाचे मंत्री जयपाल रेड्डी यांनी नवी दिल्ली येथे हा अंदाज जाहीर केला. भारतात मान्सूनच्या काळात (जून ते सप्टेंबर) ८९० मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. येत्या पावसाळ्यात त्याच्या ९८ टक्केपाऊस पडेल. यात पाच टक्के कमी-अधिक बदल होऊ शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. गेल्या वर्षी भारतात सरासरीच्या ९३ टक्केपाऊस पडला. मात्र, त्याचे वितरण विषम होते. देशातील ३६ पैकी १३ उपविभागांमध्ये अपुरा पाऊस पडला. त्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाडा या दोन उपविभागांचाही समावेश होता. त्यामुळेच राज्याच्या या पट्टय़ात दुष्काळाची भीषण स्थिती आहे. पाण्यावरून जिल्ह्याजिल्ह्यांत होणारे वाद, धरणांच्या पाणीवाटपाची न्यायालयीन लढाई अशा परिस्थितीमुळे कातावलेल्या जनतेला यंदा मान्सून दिला देईल, असा अंदाज आहे.
यंदा ‘एल-निनो’ छाया नाही!
मान्सूनच्या पावसावर विपरीत परिणाम करणाऱ्या ‘एल-निनो’ या घटकाचा या वेळच्या पावसावर प्रभाव नसेल. मान्सून मॉडेल्सनुसार ती येत्या पावसाळ्यात असणार नाही. म्हणूनच या वेळचा पावसाळा चांगला असेल.
सरासरी शक्यता
९६ ते १०४ टक्के सर्वाधिक
९० ते ९६ कमी
अतिवृष्टी वा दुष्काळ अत्यल्प
यंदा सरी सरासरी!
आटलेली धरणे, कोरडय़ाठाक विहिरी, भेगा पडलेल्या शेतजमिनी आणि भीषण पाणीटंचाई.. अशा चार दशकांतील सर्वात मोठय़ा दुष्काळाला सामोरे जात असलेल्या महाराष्ट्राला ‘पाणीदार’ दिलासा देणारी बातमी हवामान विभागाने शुक्रवारी दिली.
First published on: 27-04-2013 at 05:33 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Average rain this year