गावपातळीवर अस्तित्वातील तंटे सामोपचाराने मिटविले जावेत आणि भविष्यात तंटे निर्माण होणार नाहीत, यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना अमलात आणून शांततापूर्ण रचनात्मक समाजाची जडणघडण व्हावी, या भूमिकेतून राज्य शासनाने राबविलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या अंमलबजावणीत पोलीस ठाणे स्तरावरील समितीने महत्त्वपूर्ण कामगिरी निभावली आहे. या समितीच्या राज्यात दरवर्षी सरासरी आठ हजार बैठका होत असल्याचे गृह विभागाच्या अहवालावरून लक्षात येते.
लोकसहभागातून तात्काळ व सर्वमान्य तडजोड घडवून आणण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुका, पोलीस ठाणे व गाव पातळीवर समित्या स्थापन केल्या जातात. तसेच प्रत्येक गावास तंटामुक्त गाव समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या मोहिमेची यशस्विता उपरोक्त समितीच्या कामकाजावर अवलंबून असते. त्याकरिता प्रत्येक समिती वारंवार बैठका घेऊन आपल्या कार्यक्षेत्राचा आढावा घेते. या प्रक्रियेत पोलीस ठाणे स्तरावरील समितीने सर्वाधिक बैठका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. २००७-०८ ते २०१०-११ या चार वर्षांच्या कालावधीत पोलीस ठाणे स्तरावरील समितीच्या संपूर्ण राज्यात ३३,०४० बैठका झाल्याचे गृह विभागाच्या अहवालात म्हटले आहे. याचा विचार केल्यास प्रत्येक वर्षांला या समितीच्या सरासरी आठ हजार बैठका होत असल्याचे लक्षात येते.
गावातील अस्तित्वातील तंटे आणि नव्याने तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणीत पोलीस ठाणे स्तरावरील समितीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. तंटामुक्त गाव समितीला संकलित तंटय़ांचे दिवाणी, महसुली, फौजदारी व इतर तंटे असे वर्गीकरण करणे, मिटविता येण्यासारखे तंटे वेगवेगळ्या नोंदवहीत नोंदविणे, तंटे मिटविण्याची कार्यपद्धती याविषयी पोलीस ठाणेस्तरीय बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जाते. पोलीस ठाणे स्तरावरील समिती या प्रक्रियेत मार्गदर्शकाची भूमिका बजावते. यामुळे या बैठका तंटामुक्त गाव समितीसाठी आवश्यक ठरतात. मोहिमेच्या सहाव्या वर्षांत नाशिक परिक्षेत्रात पोलीस ठाणे स्तरावरील समितीच्या ५०० हून अधिक बैठका झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे १८४ हून अधिक बैठका एकटय़ा नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या असून अहमदनगर जिल्ह्यात १००, धुळे ४९, जळगाव १११, नंदुरबार ८४ यांचा समावेश आहे.
पोलीस ठाणे समितीच्या राज्यात सरासरी आठ हजार बैठका
गावपातळीवर अस्तित्वातील तंटे सामोपचाराने मिटविले जावेत आणि भविष्यात तंटे निर्माण होणार नाहीत, यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना अमलात आणून शांततापूर्ण रचनात्मक समाजाची जडणघडण व्हावी,
First published on: 03-04-2013 at 03:51 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Averagely eight thousand meetings of police station committee in state