अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक व श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी आज, मंगळवारी पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली व श्रीरामपूरमधील पक्षप्रवेशाच्या घडामोडी निदर्शनास आणल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमवेत पक्ष संघटना व विविध विकासकामाच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाल्याचे अविनाश आदिक यांनी सांगितले. काँग्रेसच्या दहा नगरसेवकांचे भाजप प्रवेशाकडे अविनाश आदिक यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, त्यात धक्कादाय काही नाही. बऱ्याच दिवसांपासून हा विषय सुरू होता. मात्र, त्याला मुहूर्त आज मिळाला, हे नक्की. ते सर्व काँग्रेसला सोडून भाजपमध्ये का आले, हे सर्वांना माहीत आहे. परंतु, आता ते महाविकास आघाडी सोडून महायुतीत येत असल्याने मित्रपक्ष म्हणून आम्ही त्यांचे स्वागत करतो.
आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला कायम राहणार का; असे विचारले असता अद्याप नगराध्यक्षपदाची सोडत निघालेली नाही. ही जागा आरक्षित होते की, सर्वसाधारण राहते हे पहावे लागेल. जागा सर्वसाधारण राहिली तर याबाबत निर्णय घेता येईल, कारण अनुराधा आदिक या लोकप्रिय नगराध्यक्ष ठरलेल्या आहेत. मात्र, जोपर्यंत नगराध्यक्षपदाचे आरक्षण ठरत नाही, तोपर्यंत याबाबत अधिक बोलणे योग्य नाही. श्रीरामपूरच्या घडामोडीची इत्यंभूत माहिती आपण अजित पवार यांना दिली असून, पक्ष वाढीसाठी राष्ट्रवादीत कोणी येत असेल तर त्याचे स्वागत करू, असेही दादांनी सांगितल्याचे आदिक म्हणाले.
अविनाश आदिक यांनी उपमुख्यमंत्र्यांना शहराच्या विकास व अतिक्रमणामुळे झालेल्या विस्थापितांना मदत करण्याबाबत चर्चा केल्याचे आदिक यांनी सांगितले.