महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून (१३ जुलै) चिपळूण, दापोली दौऱ्यावर आहेत. आज दापोलीत ते मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन करतील. त्यानंतर ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मनसेच्या पुनर्बांधणीसाठी राज ठाकरे सध्या ॲक्शन मोडवर असल्याचं दिसत आहे. त्यात त्यांनी प्रामुख्याने कोकणावर लक्ष केंद्रित केलं आहे. दरम्यान, राज ठाकरे चिपळूणला येण्यापूर्वी मनसेचे कार्यकर्ते चिपळूणमध्ये जमले असून त्यांनी राज ठाकरे यांच्या स्वागताची तयारी केली आहे. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. जाधव यांनी राज ठाकरे यांचा दौरा, मनसेची आगामी धोरणं यासह इतर अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.
अविनाश जाधव म्हणाले, राज ठाकरे यांच्या आजच्या दौऱ्यातून आम्हाला काय मिळणार आहे, तर संपूर्ण रत्नागिरीतल्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे आज मार्गदर्शन करतील. जिल्ह्यात कशा प्रकारची कामं केली गेली पाहिजेत. राज ठाकरे यांना काय अपेक्षित आहे ते आज आम्हाला सांगतील. त्यानुसार आम्ही कोकणात कामं करणार आहोत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लोकांमध्ये खूप चिड आहे, संताप आहे. त्यामुळे लोक सध्या निवडणुकीची वाट पाहात आहेत. लोक ती चिड मतदानातून व्यक्त करतील.
हे ही वाचा >> मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाला वेळ का लागतोय? अमित शाहांच्या भेटीनंतर प्रफ…
यावेळी अविनाश जाधव यांना विचारण्यात आलं की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावर मनसेत काही चर्चा सुरू आहेत का? त्यावर अविनाश जाधव म्हणाले, मातोश्रीने आम्हाला जो काही त्रास दिला आहे, राज ठाकरे यांना जो त्रास दिला आहे, तो आम्ही कधीच विसरणार नाही. परंतु राज ठाकरे घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. त्यांनी जर शिवसेनेबरोबर (ठाकरे गट) जायचं ठरवलं तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. त्यांनी ‘एकला चलो रे’ सांगितलं तरी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.