सांगली : विशाल पाटील यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत गुरुवारी झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात त्यांच्याविरुद्ध पक्षाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई टाळली असल्याचे स्पष्ट झाले आहेत. मात्र असा निर्णय घेतानाच सांगलीतील मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न करावेत, असे आवाहनही मेळाव्यात करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मविआमध्ये जागावाटपात सांगली मतदारसंघावरून उबाठा शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता. जागावाटप अंतिम होण्यापूर्वीच या जागेवर ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केल्याने कॉंग्रेस संतप्त झाली होती. अगदी जिल्ह्यापासून दिल्लीपर्यंत गेलेल्या वादानंतरही ठाकरे गटाने या जागेवरील आपला दावा न सोडता चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम केली. त्यानंतर कॉंग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला. त्यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत आज कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन केले होते.

प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा झाला. या वेळी पटोले यांनी मविआच्या उमेदवारीवर काँग्रेसचा नैसर्गिक हक्क असताना तो डावलून उबाठा शिवसेनेच्या वाटय़ाला सांगलीची जागा दिली गेली. यामागे एक मोठे षडय़ंत्र असून, त्याचा योग्य वेळी खुलासा होईलच, पण सद्य:स्थितीत भाजपचा पराभव करायचा या हेतूने आघाडी धर्माचे पालन करून मविआचा उमेदवार विजयी करणे सर्वाची जबाबदारी आहे असेही पटोले यांनी सांगितले.  या वेळी माजी मंत्री थोरात व माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगलीच्या भावना तीव्र आहेत हे मान्य केले; मात्र त्यापेक्षा भाजपला पराभूत करणे आवश्यक असल्याचे सांगितले.पाटील यांच्याबाबतचा अहवाल दिल्लीला पाठविला जाईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पटोले यांनी सांगितले.

हेही वाचा >>>मुंबई, ठाणे, नाशिकचा तिढा अजूनही कायम; राज्यात अखेरच्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

विश्वजित कदमांचा नेत्यांना सवाल

सांगलीतील काँग्रेस एकसंघ होती. याला कोणाची तरी दृष्ट लागली आणि ही दृष्ट उतरविल्याशिवाय मी राहणार नाही. ही जागा पक्षाला मिळावी यासाठी आपण अखेपर्यंत लढा दिला. मात्र हा लढा देण्याची वेळ ज्यांच्यामुळे आली ते पक्षाचे वरिष्ठ नेते हे जागावाटपाच्या चर्चेवेळी काय करत होते असा सवाल कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री विश्वजित कदम यांनी मेळाव्यात सर्वासमोर केला. त्यांनी दिलेल्या या घरच्या आहेरामुळे बैठकीस उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांसह हे वरिष्ठ नेतेही काही काळ स्तंभित झाले.

विशाल पाटलांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

काँग्रेसचा मेळावा पार पडल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, हा प्रकार सुरू होताच काँग्रेसचे नेतेही सभास्थळ सोडून निघून गेले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avoid action on vishal patil an appeal to take the lead in the congress meeting in sangli amy