मीरा-भाईंदर, मुंबईतील रुग्णालयांकडून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ

मीरा-भाईंदर आणि मुंबई महापालिकांच्या रुग्णालयांच्या टोलवाटोलवीमुळे रेल्वे प्रवासातच प्रसूत झालेल्या भाईंदरमधील आदिवासी महिलेची आता आपल्या मुलीच्या जन्मदाखल्यासाठी वणवण सुरू झाली आहे. कांदिवली ते दादर या लोकल प्रवासादरम्यान जन्मलेली ही मुलगी आपल्या पालिकेच्या हद्दीत जन्मली नसल्याचे सांगत मीरा-भाईंदर महापालिकेने तिच्या जन्माची नोंदणी करून घेण्यास नकार दिला आहे. तर प्रसूती झाल्यानंतर माता व बाळ रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगत मुंबईतील केईएम रुग्णालयानेही आपले हात वर केले आहेत.

भाईंदर येथे राहणाऱ्या सुरेखा वाघे या गरोदर राहिल्यानंतर त्यांनी भाईंदर पश्चिम येथील टेंभा रुग्णालयात नाव नोंदवले. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रसूतीची वेळ जवळ आली असताना, ही प्रसूती अवघड असल्याचे सांगत टेंभा रुग्णालयातील डॉक्टरांनी सुरेखा यांना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. अवघडलेल्या अवस्थेतच सुरेखा यांनी शताब्दी रुग्णालय गाठले. तेथे त्यांना दोन तास ताटकळत ठेवण्यात आले. त्यानंतर ‘आमच्याकडे आवश्यक सुविधा नाहीत’ असे सांगून रुग्णालयाने सुरेखा यांना मुंबईच्या नायर रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.

रुग्णालयाने रुग्णवाहिका पुरवण्याची तसदीही न घेतल्याने सुरेखा यांचे पती सुशील यांनी त्यांना लोकलने मुंबईत नेण्याचा निर्णय घेतला. परंतु कांदिवली ते दादर दरम्यान लोकलमध्ये सुरेखा प्रसूत झाल्या. दादर    स्थानकात रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्यांना परळच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तीन महिने उपचार घेतल्यानंतर गेल्या महिन्यात त्यांना घरी सोडण्यात आले. इतक्या धावपळीनंतरही माता आणि बाळ सुखरूप असल्याचा या कुटुंबाला आनंद होता. परंतु या बाळाच्या जन्मदाखल्याच्या प्रश्नाने त्यांना पेचात पकडले आहे. सुरेखा यांच्या पतीने केईएम रुग्णालयात दाखल्याबाबत चौकशी केली, त्या वेळी मुलगी रुग्णालयात जन्माला आली नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी जन्म झाला, त्या ठिकाणाहून दाखला घ्या, असा सल्ला केईएम रुग्णालयातून देण्यात आला. सुरेखा या भाईंदर येथे राहतात. त्यामुळे दाखल्यासाठी त्यांनी मीरा-भाईंदर महापालिकेत चौकशी केली. त्या वेळी मुलीचा जन्म महापालिका हद्दीत झाला नसल्याने दाखला देण्यास महापालिकेने असमर्थता दाखवली, अशी माहिती सुशील यांनी दिली.

लोकलमधील सर्व घडामोडींबाबतची नोंद नोंदवहीत लिहिलेली असते. रेल्वे प्रवासात आरोग्याच्या आपत्कालीन समस्या उद्भवल्यास वैद्यकीय सेवा रेल्वेमार्फत पुरवल्या जातात. जर कोणत्याही महिलेची प्रसूती झाली असल्यास त्याबाबतची नोंद लोकल नोंदवहीत केलेली असते. जर कोणत्याही रुग्णालय रेल्वेत जन्म झालेल्या बाळाला दाखला देत नसेल तर आम्ही त्यांना लेखी पत्र देऊ शकतो.

– रवींद्र भाकर, जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

माझ्या मुलीचा, आरतीचा जन्म रेल्वे प्रवासात झाला. परंतु रेल्वे प्रशासनाकडून जन्मदाखला देण्यात येत नाही. जन्मदाखला नसेल तर आमच्या मुलीच्या शाळाप्रवेशापासून सर्वच प्रक्रियेत अडचणी येतील. पण आता कुठे दाद मागायची तेच कळत नाही.

– सुरेखा वाघे, पीडित माता

ही महिला मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीत बाळंत झालेली नाही. त्यामुळे नियमानुसार आम्ही तिला जन्मदाखला देऊ शकत नाही. महिला प्रवासात असताना प्रसूत झाली असल्याने ज्या सार्वजनिक वाहनाने ती प्रवास करत होती, त्या आस्थापनाने त्याची नोंद स्थानिक महापालिकेच्या कार्यालयात करणे आवश्यक आहे. त्या आधारावर त्या महापालिकेकडून मुलीचा जन्मदाखला मिळू शकेल.

– डॉ. प्रमोद पडवळ, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मीरा भाईंदर महानगरपालिका.

या प्रकरणाबाबत मला माहिती नाही. परंतु, अशा प्रकरणांमध्ये जन्म दाखला देण्यास काहीच हरकत नसते.  प्रसुती ज्या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणापासून जवळच्या पालिका रुग्णालयात त्या महिलेला आणि नवजात बालकाला दाखल करता येते.  दोन साक्षीदार असतील तर जन्म दाखला देण्यास काहीच हरकत नाही.

– हेमंत देशमुख, अधिष्ठाता, केईएम

Story img Loader