भारताला वैदिक हिंदू राष्ट्र करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. गुजरातच्या शालेय अभ्यासक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक काढून टाकणे, हे त्याचेच द्योतक आहे. गुजरात सरकारचे हे धोरण हुकूमशाही वृत्तीचे असल्याची टीका भारिप महासंघाचे अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केली.
उस्मानाबाद तालुक्यातील अनसुर्डा येथे भेट देण्यास आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारसह गुजरात सरकारवर टीकेची तोफ डागली. गुजरातेत शालेय अभ्यासक्रमातून डॉ. आंबेडकरांचे पुस्तक िहदू धर्माविरोधात आक्षेपार्ह मजकुराचे खोटे कारण पुढे करीत गुजरात सरकारने वगळण्याचा निर्णय घेतला. त्याचा प्रकाश आंबेडकर यांनी निषेध केला. या बाबत जनजागृती करून हा लढा लोकांपर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय महापुरुष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे अभ्यासक्रमातून काढलेल्या पुस्तकाचे शीर्षक आहे. गुजरात सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून पाचवी ते आठवीच्या मुलांना हे पुस्तक अभ्यासासाठी ठेवले होते. या पुस्तकावर आधारित राज्यस्तरीय प्रश्नोत्तर स्पर्धा घेण्याची सरकारची योजना होती. मात्र, पुस्तकात िहदू धर्माविरोधात मजकूर असल्याचा आक्षेप घेण्यात आल्यानंतर ते मागे घेण्यात आले. पुस्तकातील काही मजकुरामुळे प्राथमिक शाळेच्या मुलांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता होती. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने ते योग्य नव्हते. त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतल्याचे सामाजिक न्याय विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले असल्याचे खासदार आंबेडकर यांनी निदर्शनास आणले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये नागपूर येथे िहदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारला. त्यावेळी झालेल्या सामूहिक धर्मातरादरम्यान आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना २२ प्रतिज्ञा दिल्या. िहदू धर्म असमानतेवर आधारित आहे. िहदूंच्या परंपरा आणि दैवतांचा आम्ही त्याग करतो, अशी घोषणाही आंबेडकरांनी केली होती. या सर्व प्रतिज्ञांचा समावेश पुस्तकात होता. त्यावरच आक्षेप घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गुजरातमधील दलित विचारवंत पी. ए. परमार यांनी लिहिलेले हे पुस्तक अहमदाबादेतील सूर्या प्रकाशनने प्रकाशित केले आहे. आतापर्यंत पुस्तकाच्या ४ लाख प्रति छापण्यात आल्या. त्यातील बहुतांश वितरीतही झाल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.