अलिबाग- अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्ग नेमका कोणाचा हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. महामार्गाच्या कामात यंत्रणांची टोलवाटोलवी सुरू आहे. महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग दोन्ही विभाग या रस्त्याची जबाबबदारी झटकत आसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाबाबत दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न अलिबागकरांना पडला आहे. सुरवातीला अलिबाग ते वडखळ हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. त्याला राज्य मार्गाचा दर्जा होता. नंतर मात्र याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देण्यात आले. यानंतर या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याचे सर्वेक्षण, प्रकल्प अहवालही तयार करण्यात आला होता. पण रस्त्याच्या किमतीपेक्षा भुंसपादनाची किमंत अधिक असल्याने आणि याच परिसरात अलिबाग विरार बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्प येणार असल्याने या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव बारगळण्यात आला. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्याची विनंती केली. त्यानुसार हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय झाला. मात्र हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग दोघेही या रस्त्यांच्या कामाकडे लक्ष्य द्यायला तयार नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा