‘कोमसाप’च्या वाङ्मयीन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, कोकणातील साहित्यिकांच्या कादंबरी, काव्यसंग्रह, कविता, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा, ललितगद्य, बालवाङ्मय, संकीर्ण, वैचारिक, नाटक, एकांकिका या साहित्य प्रकारांना हे पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार वितरण ९ डिसेंबरला दापोलीतील ‘श्री. ना. पेंडसे साहित्यनगरीतील सरविश्वेश्वरैया’ सभागृहात केले जाणार आहे. यावर्षीचे पुरस्कार- र. वा. दिघे स्मृती कादंबरी पुरस्कार विनीता ऐनापुरे यांच्या ‘वीणा’ या कादंबरीसाठी, वि. वा. हडप स्मृती कादंबरी पुरस्कार डॉ. दत्ता पवार यांच्या ‘चंदनाची चोळी’, वि. सी. गुर्जर स्मृती काव्यसंग्रह पुरस्कार गिरिजा कीर यांच्या ‘गोष्ट सांगतेय ऐका’, विद्याधर भागवत स्मृती कथासंग्रह विशेष पुरस्कार उदय जोशी यांच्या ‘आगंतुक’ या संग्रहाला देण्यात येणार आहे. आरती प्रभू स्मृती काव्य पुरस्कार सुदेश मालवणकर यांच्या ‘कॅम्प नंबर’, तर कविता संग्रहाचा विशेष पुरस्कार लता गुठे यांच्या ‘जीवनवेल’ संग्रहाला देण्यात येणार आहे. समीक्षेचा पुरस्कार पु. द. कोडोलीकर यांच्या ‘वेध साहित्याचा-संस्कृतीचा’ या पुस्तकाला, चरित्र-आत्मचरित्रासाठीचा धनंजय कीर स्मृती पुरस्कार प्रभाकर पणशीकर यांच्या ‘आठवणीतील माती’ या साहित्यकृतीला, चरित्र-आत्मचरित्रातील श्रीकांत शेटय़े स्मृती विशेष पुरस्कार राजेंद्र प्रसाद मसुरकर यांच्या ‘चरित्रकार धनंजय कीर’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे. अनंत काणेकर स्मृती ललित गद्य पुरस्कार- सूर्यकांत मालुसरे यांच्या ‘आंधण आणि विसावण’,  लक्ष्मीबाई आणि राजाभाऊ गवांदे ललित गद्य पुरस्कार (विशेष)- पंढरीनाथ रेडकर यांच्या ‘हंबर’ या पुस्तकाला, प्र. श्री. नेरुरकर स्मृती बालवाङ्मय पुरस्कार-सूर्यकांत मालुसरे यांच्या ‘शिवगाथा’, संकीर्ण वाङ्मयासाठीचा वि. कृ. नेरुरकर स्मृती पुरस्कार आचला जोशी यांच्या  ‘आश्रम नावाचं घर’, वैचारिक साहित्याचा फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार नीलिमा भावे यांच्या ‘शिवकालीन स्त्रियांच्या अधिकारकक्षा’ला दिला जाणार आहे.

Story img Loader