कोकणच्या मातीत आपली नाळ रुजवून सामाजिक, शैक्षणिक, लोककला, माध्यमे आणि समाजप्रबोधन आदी क्षेत्रात कार्य करणाऱ्या एकूण ७ व्यक्तींची ‘बोडस चॅरिटेबल ट्रस्ट’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यापैकी दोघांना ‘कर्तव्यनिष्ठा’ तर उर्वरित पाचजणांना ‘कार्यगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा येत्या ८ मार्चला आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. उदय बोडस यांनी दिली. ट्रस्टच्या ५ सदस्यीय विश्वस्त मंडळाने ही नावे निश्चित केली आहेत. ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक ‘आरसा’चे संपादक बाळासाहेब भिसे आणि आकाशवाणीवरील ‘गुलिस्ताँ’ कार्यक्रमाचे सादरकर्ते सिराज अहमद खान यांची ‘कर्तव्यनिष्ठा’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्परोपटे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘कार्यगौरव’ पुरस्कारासाठी नारायण बारगोडे (गावकर-पोमेंडी ग्रामपंचायत), वेदमूर्ती मुरवणे (ऋग्वेद गुरुकुल, वायंगणी, मालवण), सरोज गोगटे (निवृत्त बालवाडी शिक्षिका), शुभांगी तेरेदेसाई (ज्येष्ठ काळजीवाहक, विद्या पाळणाघर) आणि सिंधुदुर्ग विभागातील एस. टी. कार्यशाळेतील एक मेकॅनिक या पाचजणांची निवड करण्यात आली आहे. (कार्यशाळा मेकॅनिकचे नाव १ मार्च रोजी जाहीर केले जाणार आहे.) या सर्वाना २,५०० रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्परोपटे असा पुरस्कार देण्यात येणार आहे.
या पुरस्कारांचे वितरण ८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता शहरातील फाटक प्रशालेच्या सीताबाई गांधी सांस्कृतिक भवनात डॉ. अलीमियाँ परकार, रामजीभाई पटेल आणि मोहिनीताई पटवर्धन या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे, असे बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. उदय बोडस यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा